Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआरक्षणाची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार

आरक्षणाची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Chief Minister Eknath Shinde )यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत तीन ऐवजी चार सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेऊन दोन दिवस झाले तरी नाशिक महापालिकेला याबाबतचे कोणत्याही प्रकारे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या आरक्षणाची ( NMC Reservation List )अंतिम यादी जाहीर होणार आहे. याच्यावर एकूण पंधरा हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्या सर्व फेटाळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

2017 साली नाशिक महानगर पालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग नुसार झाली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच मागील प्रभाग रचना रद्द करीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला. मात्र आता भाजप व शिंदे सरकारकडून नवी प्रभाग रचनाच रद्द करून पूर्वीचीच प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयामुळे नाशिकमधील भाजपकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर नाशिक पालिका प्रशासनाकडे कुठलाही अध्यादेश आलेला नाही. त्यामुळे पालिका अधिकारी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 66 जागा मिळाल्या होत्या. परन्तु ठाकरे सरकारने तीन सदस्य प्रभाग रचना करत भाजपाला धक्का दिल्याचे बोलले जात होते.

चार सदस्य प्रभाग रचना ही भारतीय जनता पक्षासाठी पोषक आहे. म्हणून सत्ता बदल होताच महाविकास आघाडी सत्ता काळात करण्यात आलेली तीन सदस्य प्रभाग रचना रद्द करून पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना म्हणजेच 2017 च्या निवडणुकीप्रमाणे निवडणुका घेण्याच्या निर्णय कॅबिनेट मध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, मात्र निवडणूक आयोग याच्यावर काय निर्णय घेते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण प्रशासकीय पातळीवर तीन सदस्य प्रभाग पद्धतीनुसार जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्र व त्यासाठी लागणारा स्टाफ हे काम शिल्लक राहिले आहे. मात्र पुन्हा चारच्या प्रभागाने निवडणूक घेण्याचे ठरले तर नाशिक महापालिकेत 11 नगरसेवकांची जी वाढ होणार होती ती रद्द होऊन पुन्हा 122 नगरसेवक निवडून जाणार आहे. मात्र प्रत्येक प्रभागात मतदार वाढणार आहे. कारण मागील पाच वर्षात मतदार वाढ झाली आहे.2011 ची जनगणना लक्षात घेऊन कार्यवाही होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या