Friday, May 3, 2024
Homeनाशिकहिमॅटॉलॉजी परिषद : रक्तविकार टाळण्यासाठी काळजी आवश्यक

हिमॅटॉलॉजी परिषद : रक्तविकार टाळण्यासाठी काळजी आवश्यक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रसूती कालावधीत रक्ताशी निगडित विकार (Blood related disorders)झाल्यास ते अधिक धोकादायक ठरु शकतात. वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून वेळीच निदान व उपचार झाले पाहिजे. प्रसुती काळात माता व गर्भ या दोघांची विशेष काळजी घेत रक्तविकार टाळता येऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

- Advertisement -

डॉ. अभय भावे, डॉ.प्रांतर चक्रवर्ती, डॉ.शहनाज खोडिआजी, डॉ. परिक्षित प्रयाग, डॉ. नेहा लाड, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ.नलिनी बागूल यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले. हॉटेल रॅडिन्सन ब्ल्यू येथे इंडियन सोसायटी ऑफ हिमॅटोलॉजी अॅण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन (आयएसएचबीटी) (Indian Society of Hematology and Blood Transfusion) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ( IMA Nashik ) शाखा यांच्या वतीने हिमॅटोलॉजी फॉर ऑल ही दोन दिवसीय परीषद आयोजित केली होती. या परीषदेत रविवारी (दि.21 ऑगस्ट) दुसर्‍या दिवशी तज्ञांनी सहभागी होतांना मार्गदर्शन केले.

रक्ताचे विकार जीवघेणे ठरु शकतात. जागृकता वाढत असल्याने रक्तविकारांचे निदान होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून, यामुळे रुग्णांना वेळीच उपचार उपलब्ध होत आहेत. समाजात आणखी व्यापक जागृकतेवर भर देण्याचे आवाहन तज्ञांनी केले. प्लेटलेट या रक्तपेशी कमी झाल्यास कोणत्या तपासण्या कराव्यात व कुठल्या रुग्णाला किती तातडीने उपचार करावे यावर चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले. रक्तविकार होण्याची विविध कारणे व इतर आजारांची शक्यता यावर उहापोह झाला. रक्तक्षय (निमिया) ही अतिशय सामान्य गोष्ट आहे.

पण त्याची कारणे विविध असू शकतात. प्रत्येक रुग्णावरील उपचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये स्त्रीरोग तज्ञ, रक्तविकार तज्ञ, व फिजिशियन या सगळ्यांनी एकत्रितपणे चर्चा करुन उपचारांची दिशा ठरविणे अपेक्षित असते, असे तज्ञांनी आवर्जुन नमूद केले. अतिरिक्त अतिरक्तस्त्राव होण्याची कारणे, रक्त गोठविण्याच्या प्रक्रियेतील अडथळे, यावरही व्याख्याने झाली. ताप येणे ही सामान्य प्रक्रिया असून, यात रक्ताची तपासणी केल्यास पांढर्‍या पेशींची संख्या कधीकधी कमी झालेली आढळते. यावेळी कुठल्या तपासण्या कराव्यात, यावरही चर्चा करण्यात आली. अपघात किंवा प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास उपचाराच्या दिशेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान या राष्ट्रीय परिषदेत डॉक्टरांनी नोंदविलेल्या सहभागाबद्दल आयोजकांच्या वतीने नाशिक आयएमएच्या अध्यक्षा तथा आयोजन समितीच्या सचिव डॉ.राजश्री पाटील, सचिव डॉ.विशाल पवार, आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ.मैत्री भट्टाचार्य, समन्वयक डॉ.सिद्धेश कलंत्री यांनी आभार मानले. परीषद यशस्वी होण्याकरिता डॉ.गीतांजली गोंदकर, डॉ.किरण शिंदे, डॉ.माधवी गोरे-मुठाळ, डॉ.शलाका बागूल, डॉ.प्रेरणा शिंदे, डॉ.अस्मिता मोरे, डॉ.स्नेहल जाधव, डॉ.सुचेता गंधे, डॉ.शीतल मोगल यांनी परीश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या