अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 13 वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. आरोपी राहुल रोहील कौर (रा. इंदिरा कॉलनी, पंजाबी हॉटेलमागे, तारकपूर) आणि प्रशांत यादव वाघमारे (रा. कौलारू झोपडपट्टी, सर्जेपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नगर शहरामध्ये 2008 मध्ये अपहरणासह दरोड्याची घटना घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी राहुल कौर आणि प्रशांत वाघमारे हे दोघे 13 वर्षांपासून फरार होते. न्यायालयाने या गुन्ह्यामध्ये दोघांना अजामीन पात्र वारंट काढले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा शोधून या दोघांना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक केली. या दोघांनाही पुढील कार्यवाहीसाठी तोफखाना पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, शंकर चौधरी, भीमराज खर्से, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.