Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षिकेवर शिक्षकाचा अत्याचार

शिक्षिकेवर शिक्षकाचा अत्याचार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

एका 41 वर्षीय शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून तिचा गर्भपात करणार्‍या शिक्षकासह त्याच्या मित्राविरुद्ध अत्याचार व बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

योगेश अण्णासाहेब थोरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व गणेश शेंगाळ (रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील एका शाळेवर शिक्षिका म्हणून पीडित महिला कार्यरत आहे. जुलै 2019 मध्ये जुनी पेन्शन हक्क संघटना या कामा संदर्भाने सदर महिलेची योगेश अण्णासाहेब थोरात याच्याबरोबर ओळख झाली. दोघेही एमपीएससीचा अभ्यास करत असल्याने त्यांच्यात वारंवार फोनवर बोलणे सुरू होते. याच दरम्यान त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. मैत्रीच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात जवळीक निर्माण झाली.

मैत्रीच्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत, असे सदर महिलेने योगेश थोरात याला सांगितले, मात्र त्याचा मला काही फरक पडत नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करू, तुला आयुष्यभर सांभाळेन, असे त्याने सांगितल्याने तिची त्याच्यासोबतची जवळीक वाढली. मात्र अधून मधून त्याचे दुटप्पीचे बोलणे येऊ लागले होते.त्यामुळे सदर महिला ही संगमनेरला त्याला भेटायला येत होती. तोही तिला भेटण्यासाठी राहुरीला जात असे. दरम्यान त्याने तिच्याकडे गाडी रिपेअरिंगसाठी व वडिलांच्या आजारपणासाठी पैसे मागितले. त्यावर तिने त्याला 3 लाख 50 हजार रुपये बँक खात्यावर टाकले.

त्यापैकी त्याने एक लाख परत केले. त्यानंतर सदर महिलेला त्याने पुणे येथे एका लॉजींगवर वेळोवेळी नेले. त्यानंतर योगेश याने तिला सांगितले की, माझी आई म्हणते मी सांगेन त्याच मुलीशी तु लग्न करायचे. त्यावर सदर महिलेने त्याला सांगितले की, तु मला फसवू शकत नाही. प्रेम माझ्याबरोबर व लग्न दुसरी बरोबर कसे काय करु शकतो. त्यानंतर योगेश याने 2022 मध्ये पुन्हा लग्नाचा विषय काढला. त्यानंतर त्याने लग्न केले. त्यानंतर सदर महिला ही त्याच्यापासून तुटक झाली. त्यानंतर योगेशने पुन्हा सदर महिलेला संगमनेरला बोलवले. ते भेटले. त्यानंतर योगेश याने सदर महिलेला राहुरीला सोडण्यास येतो असे सांगितले. त्याच्या चारचाकी गाडीतून सोडण्यास निघाला.

कोकणगावच्या पुढे गेल्यावर त्याने गाडी आडबाजूला नेली. तेथे त्याने सदर महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी सदर महिला गरोदर राहिली. हे कळाल्यावर योगेश व सदर महिला पुन्हा भेटले. कोल्हार ते बाभळेश्वर रस्त्याने जात असताना त्याने गाडी थांबवून नाराळाचे पाणी पिण्यास दिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी देखील दोघे भेटले. त्यावेळी त्याने दही खाण्यास दिले. एक चमचा दही खावून उर्वरित रात्री खाईल म्हणून घरी नेले. त्याने फोन करुन विचारले की दही खाल्ले का? त्यानंतर रात्री तिच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर त्याने घरी सदर महिलेच्या घरी जावून तिला नगर येथे दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, पोटातील बाळ मयत झाले आहे.

हैद्राबाद येथे पाठविलेल्या रिपोर्टनुसार सदर महिलेला गर्भधारणा राहु शकते, तुम्ही फीट आहात असे, नमुद केल्याने सदर महिलेच्या लक्षात आले की योगेश याने दहीतून काही तरी खायला दिल्याने गर्भपात झाला. त्यानंतर योगेश याने संपर्क करण्याचे टाळले. त्यानंतर सदर महिला संगमनेरला आल्यावर तिला कळाले की, योगेश याने एका महिलेकडून गर्भपात करण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यादिवशी योगेश थोरात व त्याचा मित्र गणेश शेंगाळ व आणखी एक महिला तिला भेटले. योगेश व गणेश यांनी तिला बळजबरीने गाडीत बसवून जिवे मारण्याची धमकी दिली. सदर महिला आजारी असल्याने संगमनेरातीलच एका खासगी रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल करुन सदर तिघे निघून गेले. त्यानंतर योगेश थोरात याने तिच्याशी संपर्क तोडला. त्यानंतर तिच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली. लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार झाला. गर्भपातही करण्यात आला.

या कारणास्तव सदर पिडीत महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता 376, 313, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या