Friday, May 3, 2024
Homeधुळेचोरीसह बनावट क्रमांकाच्या 7 रिक्षा जप्त

चोरीसह बनावट क्रमांकाच्या 7 रिक्षा जप्त

धुळे । Dhule

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज तिहेरी कामगिरी केली. शहरात फिरणार्‍या चोरीच्या व बनावट क्रमांक असेलल्या सात रिक्षा जप्त करण्यात आल्या. तसेच वृध्दाला फसविणार्‍या जळगावच्या सराईत आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीलाही अटक करण्यात आली. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रपरिषदेत एलसीबीच्या कामगिरीचे कौतूक केले.

- Advertisement -

शहरातील देवपुर पोलीस ठाणे हद्दीत अब्दुल रहीम मजीद शेख (वय 30 रा.गौसीया मस्जीद जवळ, विटभट्टा, देवपुर) हा त्याच्या ताब्यात चोरीची रिक्षा (क्र. एमएच 18 एपी 0034) असल्याची गुप्त माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार पथकाने त्याला विटाभट्टी परिसरातून ताब्यात घेतले. रिक्षाबाबत विचारणा केली असता त्याने रिक्षाची कागदपत्रे नसल्याचे सांगुन रिक्षा कल्याण येथील भोईर नावाच्या व्यक्तीकडुन खरेदी केल्याचे सांगीतले. तसेच त्याने दिलेल्या माहितीवरून चोरीच्या व बनावट क्रमांकाच्या एकुण 7 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत एकुण साडेचार लाख रूपये इतकी आहे. या 7 पैकी एमएच 05 डीझेड 2237, एमएच 05 बीजी 5492व एमएच 18 एपी 0034 (मुळ क्र. एमएच 48एन 6309) अशा तीन रिक्षा पुढील तपासासाठी मध्यवर्ती व उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

वृध्दाची फसवणूक करणारा आरोपी गजाआड- शहरातील पारोळा रोडवरील सीमा हॅण्डलुम समोर नातेवाईक असल्याचे सांगुन मदनलाल जमनालाल मिश्रा (वय 85 रा.शिवशक्ती कॉलनी, धुळे) या वृध्दाची फसवणूक करणार्‍या सराईत आरोपीलाही एलसीबीने गजाआड केले आहे. दिगंबर कौतीक न्हावी/मानकर (वय 51 रा. असोदा रोड, मोहन टाकीजवळ, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दि. 23 ऑक्टोबर रोजी मिश्रा यांना नातेवाईक असल्याचे सांगून मुलीच्या साखरपुढ्यासाठी सोने खरेदी करायचे आहे, माझ्या सोबत चला असे सांगत त्यांच्या हातातील अंगठी बघायला मागितली.

त्यांनतर फळे घेवून येतो, सांगत अंगठी घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी आझादगनर पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने त्या आरोपीला त्यांच्य राहत्या घराजवळून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 20 हजार रूपये किंमतीची 5 ग्रॅमची अंगठी देखील हस्तगत केली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलिस हवालदार रफीक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, पोना योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, तुषार पारधी, मयुर पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या