Thursday, May 2, 2024
Homeनगरवेटरच्या खुनाचा आठ महिन्यांनी झाला उलगडा

वेटरच्या खुनाचा आठ महिन्यांनी झाला उलगडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील एका हॉटेलमधील वेटरच्या खुनाचा उलगडा करण्यात आठ महिन्यांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलिसांनी यातील आरोपी राजू उर्फ राज प्रभाकर औटी (वय 46 रा. क्रांती साखर कारखान्याजवळ, देवीभोयरे ता. पारनेर) याला अटक केली आहे. त्याने हॉटेल मंथनमधील वेटर मन्सुर अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

23 फेब्रुवारी, 2022 रोजी राहुल राजू लाळगे (वय 27 रा. निघोज ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या हॉटेल मंथनमध्ये वेटर म्हणून काम करणारा मन्सुर अन्सारी यास अज्ञात इसमाने हत्याराने गळ्यावर वार करून जिवे ठार मारून पाडळीआळे (ता. पारनेर) गावचे शिवारात शेतामध्ये मृतदेह टाकून दिला आहे. दिलेल्या फिर्यादवरून पारनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, विशाल दळवी, संतोष लोढे, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर यांचे पथक या गुन्ह्याच्या तपासात काम करत होते.

पथकाने पारनेर तालुक्यातील निघोज, देवीभोयरे, वडझिरे, लोणीमावळा, अळकुटी, पाडळीआळे तसेच जुन्नर (जि. पुणे) तालुक्यातील बेल्हे, राजुरी व आळेफाटा परिसरात आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसम राजू औटी याने खून केल्याची माहिती पथकास मिळाली होती. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करून संशयित इसम राजू औटी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या