Monday, May 6, 2024
Homeनगरराळेगणसिद्धीतील उपक्रम राज्यभर राबवणार

राळेगणसिद्धीतील उपक्रम राज्यभर राबवणार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ जे समाजोपयोगी व प्रेरणादायी आदर्श उपक्रम राबवित आहेत, ते विविध जातीधर्मांच्या भिंती नष्ट करणारे व मानवतावादी आहेत. हे उपक्रम राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

- Advertisement -

शनिवारी (दि. 19) रात्री राळेगणसिद्धी येथे ग्रामपरिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात महाजन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिणी पारेख, अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. सामाजिक सलोखा जपणार्‍या राळेगणसिद्धीच्या सामाजिक कार्याची ओळख केवळ देशभरातच नव्हे तर जगभर असल्याचे गौरवोद्गार मंत्री महाजन यांनी काढले. यावेळी बोलताना हजारे म्हणाले, की राळेगणसिद्धी, हिवरेबाजार येथील ग्रामस्थांनी जे काम केले आहे, त्याचा गुणाकार झाला पाहिजे. आज गावागावात द्वेषभावना वाढत आहे. त्यासाठी संपूर्ण गावाने मतभेद विसरून गावाचा वाढदिवस साजरा केल्यास सामाजिक सद्भावना निर्माण होण्यास मदत होईल.

हजारे यांच्या दिवंगत मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा ग्राम परिवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिक चंद्रभागा भाऊ पठारे यांचे ग्राममाता म्हणून तर माधव भिवा आवारी यांचे ग्रामपिता म्हणून पूजन करण्यात आले. वर्षभरात जन्माला आलेल्या 30 नवजात बालकांचे अंगडेटोपडे देऊन स्वागत करण्यात आले. तर 14 नववधूंचे ओटीभरण करून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच लाभेश औटी यांनी केले. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, डॉ. धनंजय पोटे, डॉ. तात्याराव लहाने इत्यादींची भाषणे झाली. सुभाष पठारे यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रामगौरव पुरस्काराने यांचा सन्मान

यावेळी राळेगणसिद्धीच्या लौकिकात भर घालणार्‍या विविध क्षेत्रातील 17 नागरिकांना ग्रामगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. गणेश पोटे, युवा उद्योजक संतोष तुकाराम मापारी, संतोष सहादू मापारी, प्रगतीशील शेतकरी गणेश मापारी, दिपक पठारे, दूध उत्पादक एकनाथ मापारी, विश्वनाथ गावडे, गुणवंत विद्यार्थी जय पोटे, सिद्धेश मापारी, राष्ट्रीय नेमबाज शार्दूल उगले, निवृत्त सैन्य अधिकारी ठकसेन पठारे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव, राहूल गाजरे, नाना आवारी, गुणवंत शिक्षक भाऊसाहेब धावडे, राजेंद्र पोटे व गणेश भोसले यांना गौरव करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या