Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरात, हिमाचल प्रदेश निकालांचा नाशकात संमिश्र सूर

गुजरात, हिमाचल प्रदेश निकालांचा नाशकात संमिश्र सूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात ( Gujrat )तसेच हिमाचल प्रदेश ( Himachal Pradesh ) विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. गुजरातमध्ये पुन्हा भाजपने सत्ता राखली, मात्र हिमाचलमध्ये काँग्रेसकडे सत्ता गेली आहे. यावर नाशिकमधील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

- Advertisement -

गुजरातचा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा विजय आहे. भाजपच्या विकासाच्या दृष्टीचा विजय आहे. सबका साथ, सबका विकास, या भूमिकेला गुजरातच्या जनतेने भरभरून साथ दिली आहे. जनतेच्या मनातील भूमिका विरोधी पक्षाने आधीच ओळखलेली होती. आगामी काळात महाराष्ट्रात व देशात देखील याच विजयाची पुनरावृत्ती होईल, याबाबत शंका नाही.

– आ. देवयानी फरांदे, भाजप

मतदारांनी विकासाला मतदान केले आहे, हे या निकालावरून लक्षात येते. मनसेनेने नाशिक मनपाच्या माध्यमातून 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात भरपूर विकासकामे केली आहे. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत पुन्हा नाशिककर राज ठाकरे यांच्यावर विश्वास टाकून मतदान करतील व आम्ही नाशिक विधानसभा असो की मनपा निवडणुकीत मुसंडी मारणार.

– अंकुश पवार, जिल्हा अध्यक्ष मनसेना

आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने हा विजय आहे. केंद्रामध्ये सत्ता असताना हिमाचल प्रदेश, दिल्ली यासोबत इतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. याचाच अर्थ मोदींचा करिष्मा आता उचलत आहे. केवळ गुजरात पुरताच करिष्मा उरला आहे. करिष्मा आता भारतातील इतर राज्यांमध्ये काम करीत नाही हेच यावरून सिद्ध होत आहे.

– डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष माकपा

दिल्ली महापालिका व हिमाचल प्रदेशात देखील भाजपला हार पत्करावी लागली असल्याने देशात भाजप विरोधात लाट तयार होत आहे. गुजरातमध्ये केंद्र सरकारने गेल्या तीन ते चार महिन्यांत सुमारे तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयांचे महाराष्ट्रातील प्रकल्प हलविल्याने तेथे भाजपची सत्ता येणे हे स्वाभाविकच होते.

– कोंडाजीमामा आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष

देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसने उभारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. युवा नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने येथे बहुमत मिळविले आहे. संघटन कौशल्याचा हा विजय आहे. गुजरात विधानसभा निवडणणुकीत मोठ्या प्रमाणात जातीवाद पसरविला गेला. पैशाच्या जोरावर भाजपने ही सत्ता मिळवली आहे.

– राजाराम पाटील पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस

गुजरातमधील दणदणीत विजयाने केंद्रातील भाजप सरकारवर जनतेचा ठाम विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. विरोधकांनी खोटेनाटे आरोप करुन दिशाभूल करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र मतदारांंनीच त्यांना चोख उत्तर दिले आहे. जनतेला विकास आता दिसत असून त्याचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले आहे.

– गिरीश पालवे, शहराध्यक्ष भाजप, नाशिक

गुजरात पंतप्रधान मोदी यांचे ते होमपीच असल्याने त्यांना यश मिळणे अपेक्षित होतेच, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्याचवेळी पंधरा वर्षापासून सत्ता असलेल्या दिल्लीमध्ये आआपाने सत्ता स्थापन केली आहे. त्यासोबतच हिमाचल प्रदेशात सत्ता काँग्रेसकडे गेली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पीछेहाटची नोंद घेणे गरजेचे आहे.

– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

गुजरात येथील 27 वर्षांच्या भाजपच्या सरकारच्या राज्यात आम आदमी पक्षाने पाच उमेदवार निवडून आणले असून भाजपच्या बालेकिल्ल्यात खाते उघडले आहे. तसेच संपूर्ण गुजरात राज्यात आम आदमी पक्षाला 41 लाख म्हणजे 13% मतदान हे मिळालेल आहे. त्यामुळे पक्षाला आज राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे.

– गिरीश उगले-पाटील, शहराध्यक्ष आम आदमी पक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या