Friday, May 3, 2024
Homeनगरअस्तगाव-खंडाळा-बेलापूर मार्गासाठी 12 कोटी मंजूर- ना. विखे

अस्तगाव-खंडाळा-बेलापूर मार्गासाठी 12 कोटी मंजूर- ना. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील अस्तगाव-खंडाळा- बेलापूर या महत्वपूर्ण मार्गासाठी केंद्रीय मार्ग निधीतून 12 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

राहाता आणि श्रीरामपूर या दोन तालुक्यांना जोडणार्‍या या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

दळणवळणाच्यादृष्टीने हा मार्ग अतिशय महत्त्वपूर्ण असून अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. उपलब्ध होणार्‍या निधीतून आता या मार्गाच्या रुंदीकरणासह नुतनीकरण करण्यात येणार असल्याने या मार्गाचा मोठा फायदा शेतकरी, स्थानिक नागरिक आणि साईभक्तांना होईल. या मार्गावर अस्तगाव, मोरवाडी, चोळकेवाडी, तरकसवाडी, गोल्हारवाडी, वाकडी, नांदूर ही गावे येत असल्याने श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील दळणवळण या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात सुरू असते.

नव्या होणार्‍या मार्गामुळे श्रीरामपूर येथील व्यापारी व शिर्डी येथे येणार्‍या भक्तांना विमानतळाचे अंतरही जवळ पडणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती उत्पादन घेतात. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, पेरू याबरोबरच फूलशेतीची बाजारपेठ मोठी असल्यामुळे या मार्गाचा शेतकर्‍यांनाही मोठा लाभ होईल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाचे धोरण निश्चित केले असून यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पुढाकार घेऊन या रस्ते विकासाला नवी दिशा दिली आहे. या पार्श्वभूमीवरच राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना जोडणार्‍या या मार्गासाठी उपलब्ध झालेला निधी महत्त्वपूर्ण असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

सध्या अस्तगाव-खंडाळा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक व अन्य वाहनांची वर्दळ असते. परंतु रस्ता अरुंद असल्यामुळे मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात. पर्यायाने छोटे-मोठे अपघात होतात. ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा रस्ता मंजूर करवून आणला. बेलापूर व श्रीरामपूर भागातील तसेच अन्य ठिकाणाहून येणार्‍या जाणार्‍यांना हा रस्ता महत्त्वाचा आहे. राहाता-श्रीरामपूर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा हा रस्ता मंजूर केल्याने विखे पाटील यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

– नंदकुमार गव्हाणे, माजी सरपंच, अस्तगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या