Friday, May 3, 2024
Homeनगर71 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर 43 कोटींची भरपाई वर्ग

71 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर 43 कोटींची भरपाई वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांची हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. याबाबतची नुकसान भरपाईपोटी अद्याप राज्य सरकारची मदत शेतकर्‍यांच्या पदरात पडलेली नसली तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 42 कोटी 64 लाख 42 हजार रुपयांची भरपाईची रक्कम जिल्ह्यातील 70 हजार 890 शेतकर्‍यांच्या खात्यावर मागील दहा दिवसांत वर्ग झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

यंदा जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवाला गेला होता. मात्र, आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील मदत शेतकर्‍यांना मिळाली आहे. यात सर्वाधिक लाभ नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला असून त्या खालोखाल शेवगाव, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यात 11 कोटी ते पाच कोटींपर्यंत विम्याची मदत शेतकर्‍यांना मिळालेली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत नगरसह राज्यभर तक्रारी होत्या.

काही जिल्ह्यात कंपन्यांनी शेतकर्‍यांना कमी भरपाई दिली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी संबधीत कंपन्यांच्या तक्रारीही केल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच मुद्द्यावर कंपन्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर कंपनीकडून शेतकर्‍यांच्या तक्रारींची शहानिशा करून त्यांना कमी वेळात भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचा परिणाम म्हणून स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत जिल्ह्यातील 70 हजार 890 शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून 42 कोटी 64 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. गेल्या दहा दिवसांत विमा कंपनीकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

काढणी पश्‍चातच्या भरपाईची प्रतिक्षा

यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांची पिके शेतात पाण्यात सडून वाया गेली. यामुळे 20 हजार 250 शेतकर्‍यांनी काढणी पश्‍चातचा पिक विमा मिळावा, अशी मागणी केलेली आहे. ही भरपाईची प्रक्रिया किचकट असली तरी उशीरा का होईना, शेतकर्‍यांना संबंधीत विमा कंपनीकडून काढणी पश्‍चातचा पिक विमा मिळले, अशी अपेक्षा कृषी अधीक्षक कार्यालयाला आहे.

अशी आहे भरपाई शेतकरी (कंसात भरपाई रक्कम)

नेवासा 13 हजार 344 (11 कोटी 38 लाख), शेवगाव 18 हजार 561 (7 कोटी 60 लाख), राहता 7 हजार 85 (6 कोटी 66 लाख), कोपरगाव 6 हजार 450 (5 कोटी 4 लाख 17 हजार), श्रीरामपूर 2 हजार 999 (3 कोटी 3 लाख), अकोले 260 (15 लाख 70 हजार), पाथर्डी 1 हजार 22 (2 कोटी 84 लाख), राहुरी 3 हजार 82 (2 कोटी 55 लाख), जामखेड 3 हजार 100 (1 कोटी 5 लाख 90 हजार), नगर 1 हजार 9 (72 लाख 65 हजार), संगमनेर 1 हजार 274 (69 लाख 35 हजार), कर्जत 849 (40 लाख 41 हजार), श्रीगोंदा 776 (25 लाख 75 हजार) आणि पारनेर 1 हजार 79 (21 लाख 78 हजार) अशी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या