Thursday, May 2, 2024
Homeनगरकमी भावात मातीचे भांडे देण्याचे आमिष; व्यावसायिकाची फसवणूक

कमी भावात मातीचे भांडे देण्याचे आमिष; व्यावसायिकाची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कमी भावात मातीचे भांडे देण्याचे आमिष दाखवून एका कुंभार व्यावसायिकाची 96 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश राज्यातील राहुल वर्मा नामक व्यक्तीविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक सुशील अशोक देशमुख (वय 41 रा. नेप्ती नाका, नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सुशील देशमुख यांचा वडिलोपार्जीत कुंभाराचा (गाडगे विकण्याचा) व्यवसाय आहे. त्यांनी 23 नोव्हेंबर 2022 रोजी फेसबुकवर माती रत्नकला क्ले या नावाने जाहिरात पाहिली, त्या जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क केला असता सदर मोबाईलधारक राहुल वर्मा म्हणाला की, माझी माती रत्नकला क्ले या नावाने कंपनी आहे. त्यानंतर त्याने देशमुख यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर सर्व माती भांड्यांचे विविध फोटो व त्यांच्या किंमती पाठविल्या. त्यातील काही मातीचे भांडे देशमुख यांना पसंत पडल्याने त्याबाबत व्यवहार झाला.

पसंत पडलेल्या भांड्याची एकूण रक्कम 91 हजार रुपये ठरली होती. तसेच वाहतुकीचे पाच हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर राहुल वर्मा याने दिलेल्या बँक खाते नंबरवर देशमुख यांनी त्यांच्या बँक खात्यातून 9 डिसेंबर 2022 रोजी आरटीजीएस मार्फत 96 हजार रुपये पाठविले. त्यानंतर काही दिवस देशमुख यांनी ऑर्डर केलेला माल येईल याची वाट पाहिली परंतु माल आला नाही म्हणून त्यांनी सदर इसमास वेळोवेळी फोन करून संपर्क करत होतो. त्यावेळी तो, हॉस्पिटलमध्ये आहे, असे वेळोवेळी उडावाउडवीचे उत्तर देत होता.

त्यानंतर त्याने देशमुख यांचा फोन उचलायचे बंद केले. देशमुख हे 23 डिसेंबर 2022 रोजी त्याने दिलेल्या पत्त्यावर खुर्जा (राज्य उत्तर प्रदेश) या ठिकाणी समक्ष जाऊन चौकशी केली. परंतु सदर नावाची कंपनी व तो इसम तेथे नसल्याचे त्यांना कळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 4 जानेवारी, 2023 रोजी फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या