Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023 : अर्थसंकल्पातून फक्त आकड्यांचा धूर; छगन भुजबळांचे टीकास्त्र

Union Budget 2023 : अर्थसंकल्पातून फक्त आकड्यांचा धूर; छगन भुजबळांचे टीकास्त्र

मुंबई | Mumbai

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील ९ वा अर्थसंकल्प (budget) सादर केला. सदरचा अर्थसंकल्प म्हणजे आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ जुमला असून यंदाचा हा अर्थसंकल्प हा फक्त आकड्यांचा धूर आहे.

- Advertisement -

या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. कारण गेल्या मागील काही वर्षात अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांचे नेमके काय झाले याचं उत्तर अनुत्तरीत राहण्यासोबत मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थमंत्र्यांची अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे जुमलेबाजी कायम असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, अर्थसंकल्पात केवळ आकडेवारीचा आणि शब्दांचा मेळ आणि खेळ करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या तरतुदीची अंमलबजावणी कशी केली जाईल याबाबत स्पष्टता नसल्याचे दिसते आहे. देशात महागाई प्रचंड वाढली असतांना सातत्याने होणारी गॅस, पेट्रोल, डीझेलची दरवाढ रोखण्यासाठी कुठलाही दिलासा दिल्याचे दिसत नाही तसेच तसा शब्दही काढला गेला नाही.

केवळ नोकरदार वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न असून सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहे. एकीकडे कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, खते, बी बियाणे योग्य दरात पुरविण्याबाबत कुठल्या उपाययोजना व अंमलबजावणी केली जाईल याबाबत स्पष्टता नसल्याचे म्हटले आहे.

Union Budget 2023 Live Updates : सामान्य करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अर्थसंकल्पातून मुंबईसह महाराष्ट्रासाठी काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. रेल्वेचे बजेट वाढविण्याची घोषणा जरी केलेली असली तरी प्रकल्पांबाबत स्पष्टता दिसत नाही. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प, नाशिक मुंबई महामार्ग सहापदरीकरण, नाशिक मेट्रो, ड्रायपोर्ट, कृषी टर्मिनल मार्केट, डीएमआयसी कॉरीडॉर यासह अनेक रखडलेल्या प्रकल्पांबाबत कुठलीही घोषणा किंवा स्पष्ट माहिती उपलब्ध झाली नाही.

देशात नवीन ५० विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र जी विमानतळ निर्माण झाली आहे त्या विमानतळांवरून नियमित सेवा सुरु करण्याबाबत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत काय असा सवाल आहे.

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ञांचे विश्लेषण पाहा Live

अर्थसंकल्पात देशातील छोट्या उद्योजकांसाठी कुठलेही पॅकेज पहावयास मिळत नाही. केवळ मोठ्या उदयोजकांच्या फायद्याचा विचार करण्यात आलेला दिसतो. गेल्या ७ महिन्यापूर्वी मोदींनी १० लाख नोकऱ्याचे आश्वासन दिले होते त्यातल्या फक्त १.५० हजार नोकऱ्या दिल्या गेल्या. देशात बेरोजगारी प्रचंड वाढत असतांना बेरोजगारी कमी करण्याबाबत कुठल्याही ठोस उपाययोजना दिसल्या नाही असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या