Friday, May 3, 2024
Homeनगरनाशिक पदवीधरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

नाशिक पदवीधरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इतिहास घडण्याची चिन्हे आहेत. आज गुरूवारी या निवडणुकीची मतमोजणी नाशिक येथे सुरू होत आहे. भाजपने छुपा पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे व महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सर्वाधिक चुरस आहे. पण रिंगणातील अन्य 14 उमेदवार किती मते घेतात, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

- Advertisement -

नाशिक विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 (49.28 टक्के) मतदान झाले आहे. आज सकाळी नाशिकला मतमोजणी सुरू होताना झालेल्या मतदानातील मतपत्रिकांची आधी तपासणी होणार आहे व यातील बाद मतपत्रिका बाजूला काढून एकूण वैध मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. ही निवडणूक पसंती क्रमांकानुसार झाली असल्याने वैध मतपत्रिकांतून विजयासाठी लागणार्‍या मतांचा कोटा ठरवला जाणार आहे व त्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिकांतील मतांची मोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारी दोननंतर या निवडणुकीच्या निकालाचा कल व सायंकाळी अंतिम निकाल अपेक्षित आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे मागील सलग तीन टर्म पासून आमदार असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी यंदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी दाखल केली नाही व त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी दाखल केली.

काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपने तांबे यांना छुपा पाठिंबा दिला. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवर असलेल्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी भाजप देत नसल्याचे जाणवल्यावर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व थेट मातोश्री गाठून शिवसेनेचा पाठिंबा मिळवला.

त्यानंतर महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. पण रिंगणातील या दोन प्रमुख उमेदवारांबाबत घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेत राहिली. त्यामुळेच आता या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचेही लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या