Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारस्ते कामासाठी ग्रामस्थांचे आंदोलन; दोन तास वाहतूक विस्कळीत

रस्ते कामासाठी ग्रामस्थांचे आंदोलन; दोन तास वाहतूक विस्कळीत

सटाणा । प्रतिनिधी Satana

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ( Vinchur Prakasha Highway)अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील( Balan Taluka) तरसाळी, वनोली, औंदाणे, वीरगाव आदी गाव परिसरातील ग्रामस्थांनी आज महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडत आपला संताप व्यक्त केला. तब्बल दोन तास रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या संतप्त ग्रामस्थांनी बांधकाम उप अभियंता व ठेकेदारांवर प्रश्नांचा भडीमार करत अक्षरश: धारेवर धरले होते.

- Advertisement -

दरम्यान, येत्या 25 फेब्रुवारीपासून सदर रस्त्याचे प्रलंबित काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिल्यानंतर दोन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक पुर्णत: विस्कळीत झाली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की माजी केंद्रीय संरक्षण मंत्री व विद्यमान खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या विशेष प्रयत्नातून विंचूर-प्रकाशा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपळनेर ते विरगाव दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण देखील करण्यात आलेले असून ठिकठिकाणी काही काम मात्र अपूर्ण अवस्थेत आहे. मात्र सद्यस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे काम बंद पडले असून संबंधित ठेकेदाराने येथील यंत्रसामुग्री-साहित्य देखील काढून घेतलेली आहे.

रस्त्याचे काम अपुर्ण असल्याने विरगाव ते सटाणा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताच्या घटना देखील सातत्याने घडून अनेकांना प्राण गमवावे लागले तर असंख्य जायबंदी देखील झाले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेने सातत्याने अपघात घडत असतांना देखील रस्त्याचे काम पुर्ण केले जात नसल्याने तरसाळी, वनोली, औंदाणे, विरगाव परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी आज विंचूर प्रकाशा महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम सटाणा विभागाचे उपअभियंता डी एस पवार व संबंधित ठेकेदारांवर संतप्त ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर 25 फेब्रुवारीपासून सदर रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात बागलाण पं.स. माजी उपसभापती वसंत भामरे, शेतकरी संघटनेचे सुधाकर रौंदळ, प्रभाकर रौंदळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर खैरनार, तुषार खैरनार, लखन पवार, वनोली सरपंच शरद भामरे, औंदाणे सरपंच भरत पवार, दीपक रौंदळ, गणेश निकम, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ, संजय भामरे, प्रशांत मोहन, उमेश रौंदळ, कोमल निकम, तुषार रौंदळ, पुंडलीक रौंदळ, राजेंद्र मोहन आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

विंचुर-प्रकाशा राज्य महामार्ग 7 चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून या चौपदरी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अतिशय संथगतीने काम करणार्‍या ठेकेदाराला बांधकाम विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत, असा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला. ठेकेदाराने दिलेल्या आश्वासनानुसार रस्त्याच्या अपुर्णवस्थेतील प्रलंबित काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत भामरे यांनी यावेळी बोलतांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या