Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याकारवाईपुढे गुडघे टेकणार नाही

कारवाईपुढे गुडघे टेकणार नाही

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ईडी आणि सीबीआयच्या कारवायांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणले जात असून त्यांच्या कुटुंबातील महिला- लहान बालकांचा विचारही न करता १६-१६ तास चौकशी केली जात आहे. पण असल्या कारवायांपुढे आम्ही गुडघे टेकणार नाही. असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

- Advertisement -

शिवसेना नेते अनिल परब यांचे निकटवर्ती सदानंद कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवायांवरून राऊत यांनी आज भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात आणि देशात सुरु असलेल्या कारवाया राजकीय सूडबुद्धीने केल्या जात आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

सदानंद कदम यांना अटक केली. खेडची सभा यशस्वी करण्यामागे जे लोक मेहनत घेत होते, त्यात सदानंद कदम यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी ईडीचे अधिकारी खेडला गेले. कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली.

बिहारमध्ये लालू यादव हे गंभीर आजारातून बरे होत आहेत. त्यांची पत्नी, गर्भवती सून, यांची १६-१६ तास चौकशी सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यांचा विषय काढला गेला आहे. भविष्यात काही कारखान्यांची यादी मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. त्यांच्याविरोधात ईडी कारवाई करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे, विशेषतः कसब्यानंतर जे वातावरण निर्माण झाले आहे त्याला खीळ घालण्यासाठी ईडीच्या कारवाया सुरु आहेत. बोगस, भंपक आणि खोट्या कारवाया आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, सदानंद कदम यांच्याबाबतीत हेच आहे. जे जे विरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात ईडी-सीबीआयच्या कारवाया सुरु आहेत. मात्र काहीही झाले तरी आम्ही गुडघे टेकणार नाही. जनता आमच्याबरोबर आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी जन्माला आले नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला नाव न घेता दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या