शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत रंगपंचमी विविध रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साईबाबा संस्थानच्या वतीनेही साईबाबांच्या रथाची विविध रंगांची उधळण करत, साई नामाच्या गजरात गावातून रंगपंचमीला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीने रंगपंचमीनिमित्त साईबाबांच्या रथाची शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली. साई भक्त, ग्रामस्थ साईरथाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. साईबाबांचा जयजयकार, विविध रंगांची उधळण करत मिरवणूक साई मंदिरापासून निघून गावातून परत मंदिर परिसरात आली. हजारो महिला पुरुष साईभक्त ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
दर रंगपंचमीला साईबाबांची गावातून निघणारी रथाची मिरवणूक एक आकर्षण असते. त्यामुळे या रंगपंचमीला रथ मिरवणुकीसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येत असतात. यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत रंगपंचमीला आले होते. रथ मिरवणुकीच्या वेळी साई संस्थांनचे संरक्षण आधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, त्याचप्रमाणे संस्थांनचे पुजारी, सुरक्षा कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शिर्डीत विविध संघटांच्या वतीने ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरांमध्ये चौकात चौकात ठिकठिकाणी संगीताच्या तालावर विविध रंगांची उधळण करत हजारो तरुण नृत्य करत रंगपंचमीचा आनंद घेत होते. शिर्डी परिसरातही रंगपंचमीचा उत्साह यावर्षी मोठा दिसून येत होता. शिर्डी व परिसरातील गावांमध्ये दुपारनंतर अनेकांनी आपापली दुकाने, आस्थापने बंद करून रंगपंचमी साजरी केली. शिर्डी व परिसरात रंगपंचमी शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी झाली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.