Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात अवकाळीचा 145 गावांना फटका

जिल्ह्यात अवकाळीचा 145 गावांना फटका

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात तीन दिवस झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 145 गावांमधील आठ हजार 468 हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. यात कांद्याचे सर्वाधिक 5814 हेक्टर, डाळिंबाचे 773 हेक्टर व 755 हेक्टर द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू, मका व भाजीपाल्यास मोठी झळ बसली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात अवकाळीचा तब्बल 11 तालुक्यांना फटका बसला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गहू, मका व भाजीपाल्यास मोठी झळ बसली.दि.7 ते 9 एप्रिल या काळात बागलाण तालुक्यातील मोसम खोरे, मालेगाव, नांदगाव, कळवण, देवळा, इगतपुरी, निफाड, सिन्नर, नाशिक तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस व गारपीट झाली.

145 गावांतील 13 हजार 284 शेतकर्‍यांचा बाधितांमध्ये समावेश असल्याचे कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. यात कांदा, डाळिंब आणि द्राक्षासह गहू (227), हरभरा (12), मका (217), टोमॅटो (54), भाजीपाला (513), कांदा रोपे (22),वेलवर्गीय फळे (35) हेक्टर यांचा समावेश आहे.परिपक्व झालेल्या द्राक्षांची काढणी सुरू असताना हे संकट कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.

अवकाळीमुळे टोमॅटो, बाजरी, लिंबू, कांदारोपे, हरभरा, जनावरांचा चारा, आंबा आदी पिकांची नासाडी झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाने कृषी विभागाच्या सहाय्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे.

तालुकानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

सटाणा 5668.50 चांदवड 760.40 मालेगाव 666 सिन्नर 366 देवळा 354.40 निफाड 343.19 नाशिक 150 इगतपुरी 87 नांदगाव 40 दिंडोरी 17 कळवण 16. एकूण – 8468.49.

हेक्टरी 50 हजाराची मदत करा : पवार

राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पवार यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. विरोधी पक्षाने शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. तर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांना मदत दिली जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे यांना पत्र पाठवून मदत घोषित करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या