Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यावज्रमूठ सभा रद्द केल्या नाहीत - नाना पटोले यांचा खुलासा

वज्रमूठ सभा रद्द केल्या नाहीत – नाना पटोले यांचा खुलासा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर आणि मुंबई येथे वज्रमूठ सभा झाल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती येथे पुढील सभा होणार आहेत. परंतु मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झाला असून, वज्रमूठ सभा रद्द केलेल्या नाहीत, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केला. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत विषयावर चर्चा झाली आहे. लवकरच या सभांचे फेरनियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा त्याग करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे तर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेलाही धक्का बसला आहे. त्यामुळे महविकास आघाडीच्या पुणे, नाशिक येथील वज्रमूठ सभांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. यासंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून वेगवेगळी माहिती देण्यात आली. यापार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी आघाडीच्या वज्रमूठ सभांचे फेरनियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी. बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक लोकांवर पोलीस अत्याचार करत आहेत. खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचे बळी गेले. त्याप्रकरणात अद्याप कारवाई केली जात नाही. या आणि राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे. म्हणून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचे पटोले म्हणाले.

मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपचे दिल्लीतील सरकार सातत्याने करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्व महत्वाच्या आर्थिक संस्था, विविध कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. मुंबईचे हे महत्व भाजपच्या डोळ्यात खूपत आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये गुजरातला हलवून मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. बुलेट ट्रेनची गरज नसताना ती मुंबई आणि महाराष्ट्रावर लादली जात आहे. मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गांधीनगरला हलवण्यात आले. मुंबई आणि राज्यातील महत्वाची कार्यालये, प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आली. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या