Thursday, May 2, 2024
Homeनगरपाचेगावात ग्रामसभेचे आयोजन करुन प्रशासकीय अधिकारीच गैरहजर!

पाचेगावात ग्रामसभेचे आयोजन करुन प्रशासकीय अधिकारीच गैरहजर!

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपलेला असल्याने सर्व कारभार प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती आहे. येथील प्रशासकीय अधिकार्‍यांनी मंगळवार 30 जूनला आठवडे बाजारच्या दिवशी ग्रामसभा बोलावली. मात्र ते स्वतःच या ग्रामसभेला गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे मागील आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचेही असेच झाले. या कार्यक्रमाकडेही प्रशासकीय अधिकार्‍याने पाठ फिरवल्याने हा उपक्रमही बारगळला.

- Advertisement -

सकाळी 9 वाजता होणारी ग्रामसभा 11 वर गेली. आणि पुन्हा एकदा गावातील नागरिक ग्रामसभेला हजेरी लावत प्रशासक व प्रशासकीय अधिकार्‍यांची वाट पाहत बसले. या शासनाच्या उपक्रमात शासनाचे अधिकारीच अनुपस्थित राहून एकप्रकारे शासनाला चॅलेंज देत असल्याचे दिसत आहे. या अधिकार्‍यांना शासनाचा अंकुश राहिलेला दिसत नाही. गावातील नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत.

पण अधिकार्‍यांना हे प्रश्न ऐकायला वेळ नाही की त्यांना ऐकायचेच नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जानेवारी महिन्यापासून पाचेगाव ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. पण हे प्रशासक गेल्या पाच महिन्यांपासून गावात फक्त तीन वेळेस आले. मग पाच महिन्यांत गावातील नागरिकांचे प्रश्न संपले का? असा सवाल गावातील नागरिक करीत आहेत. या अधिकर्‍यांना जर गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नसेल तर असे अधिकारी आमच्या गावाला नको असा गावातील नागरिकांनी एकच सूर धरला.

आज तीव्र उन्हाळ्यात गावातील प्रभाग पाच मध्ये जवळपास पाचशे सहाशे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या नागरिकांना वापरण्यासाठी पाणी मिळत नाही. पण आता तर पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण हिंडण्याची वेळ आली आहे. त्यांनी गावातील नागरिकांना आपली व्यथा मांडली, पण त्यांच्या या समस्येवर काहीही तोडगा काढला नाही. त्यामुळे या प्रभागातील लोकांनी पिण्याच्या पाण्याची व्यथा कोणासमोर मांडावी? हेच त्या प्रभागातील महिलांना कळेना.

गावातील जलजीवन योजनेचे काम चांगले होत नसल्याने, गावातील सर्व्हे चुकला,पाण्याच्या टाक्यांचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने दाखवला. या योजनेत पाईप चांगले न वापरता व कमी साईजचे वापरत असल्याने गावातील नागरिकांनी हे काम थांबविले. त्या कामाची पाहणी न करताच अधिकार्‍यांनी शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी नोटिसांद्वारे नागरिकांना दिली. त्या विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्याची आवश्यकता होती, पण प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याकारणाने त्या विषयावर काहीही चर्चा झाली नाही.

सध्या गावातील नळ योजनेला नागरिक पाण्यासाठी मोटारी लावतात. पण जर काही लोकांनी मोटारी लावल्या तर पुढील लोकांना पिण्याचे पाणी जात नाही. ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याकारणाने यांचा प्रश्न कोण मार्गी लावणार? या गोष्टीकडे त्या प्रभागातील नागरिक टक लावून बसले आहेत.

घरकुल, रेशनकार्ड मधील अनेक समस्या, गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या असे कितीतरी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासक येत नाही.गावातील ग्रामसभेला नागरिकांशी निगडित सर्व अधिकार्‍यांचा समावेश असला पाहिजे पण अधिकारी देखील या गावातील ग्रामसभेला पाठ फिरवित आहेत.

या ग्रामसभेत माजी सरपंच दिगंबर नांदे, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य वामनराव तुवर, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच श्रीकांत पवार, शेतकरी संघटनेचे भास्कर तुवर, कैलास पवार, हरिभाऊ तुवर, सोसायटीचे संचालक भाऊसाहेब साळुंके, रवींद्र देठे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पवार, विकास गायकवाड, दीपक शिंदे, माजी ग्रामविकास अधिकारी नारायण नांदे, अशोक पवार, तुषार जाधव, संदीप नांदे यांच्यासह कृषी सहाय्यक विकास बाचकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.कैलास नजन, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव वाहूरवाघ, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या