Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनृत्य, वादन, स्वरांनी ‘मल्हार’ महोत्सव रंगतदार

नृत्य, वादन, स्वरांनी ‘मल्हार’ महोत्सव रंगतदार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील कालिदास कलामंदिरात साउंड ऑफ मल्हार अर्थात ‘मल्हार’ महोत्सवात नृत्य, गायन, वादन या त्रिवेणी सादरीकरणाने रसरंगाची अनोखी धमाल उडवून दिली. नूपुर नाद, पुणे आणि मुसोमिंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव झाला.

- Advertisement -

महोत्सवात रेखा नाडगौडा यांच्या कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना ही कथक समूहरचना सादर केली. प्रथितयश भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ. स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर यांनी अर्धनारी नृत्य सादर केले. मूर्तिमंत शिवपर्वतीच रंगमंचावर अवतरले होते. नंतर ‘बाग पावस ऋतु’ या रचनेत महाकवी कालिदास व भरत मुनी यांच्या आधारे अष्टनायिका सादर केल्या. त्याचा नाशिकमध्येच शुभारंभ केल्याचे आयोजिका स्वाती दैठणकर यांनी सांगितले. वासकसज्जा, प्रोशीत भर्तृका, खंडिता अशा विविध नायिका त्यांनी ताकदीने सादर केल्या. त्यांना नीति नायर,पंचम उपाध्याय आणि संजय शाशिधरण यांनी साथसंगत केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…


अथर्व वैरागकर यांनी शास्त्रीय गायनात मेघ राग संथ लयीत सुरुवात करून हळूहळू द्रुत लय पकडली आणि रसिकांना डोलायला लावले. त्यानंतर ठुमरी सादर केली. माधव लिमये यांनी तबला साथ देताना अफलातून तुकडा सादर केला. कार्तिक स्वामी यांनी त्याला उत्तम साथ दिली.

कार्यक्रमाची सांगता संतूर वादक डॉ. धनंजय दैठणकर आणि त्यांचे पुत्र व शिष्य निनाद दैठणकर यांच्या अभिनव संतूर जुगलबंदीने झाली. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबला साथ केली. मोजकेच सादरीकरण, नाशिक व पुण्याच्या कलाकारांची भरपूर तयारी यामुळे कार्यक्रम चढत्या क्रमाने रंगत गेला. रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांना दाद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या