Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे पिता-पुत्र मैदानात; मनसे 'कमबॅक'च्या तयारीत

ठाकरे पिता-पुत्र मैदानात; मनसे ‘कमबॅक’च्या तयारीत

नाशिक |फारूक पठाण| Nashik

आगामी काही महिन्यांमध्येच देशातील लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा यासह राज्यातील मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मागे दिसत नाही. पक्षाच्यावतीने नुकताच महाराष्ट्रात महासंपर्क अभियान सुरू केला असून पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र तथा युवा नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी मोर्चा सांभाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेना कमबॅकच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी नुकताच दोन दिवसीय कोकण दौरा केला तर युवा नेते अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्रसह राज्यातील विविध भागात सतत दौरे करीत आहे. ठिकठिकाणी तरुणांचा मोठा प्रतिसाद देखील या अभियानाला मिळताना दिसत आहे. दरम्यान राज ठाकरे ज्याप्रमाणे विरोधी पक्षावर तुटून पडतात त्याच पद्धतीने आता अमित ठाकरे यांनी देखील राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेच्या वेळी बोलताना अमित ठाकरे यांनी भाजपाला चिमटा काढताना आमदार फोडण्यात जर व्यस्त राहिले नसते तर ही दुर्घटना टाळली गेली असती, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये ते उत्साह भरण्याचा प्रयत्न करीत आहे.

नुकताच शनिवारी त्यांच्या वाहनांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर आडविण्यात आला होता.  ही खबर कार्यकर्त्यांना मिळाल्याने महाराष्ट्र सैनिकांनी थेट टोलनाकरी तोडफोड केली. याबाबत अमित ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया देताना माझ्या वडिलांमुळे अर्थात राज ठाकरेंमुळे राज्यातील 65 टोलनाके बंद झाले आहे, त्याचा नागरिकांना चांगला फायदा झाला आहे तर आता माझ्यामुळे त्यात एकाची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने अमित ठाकरे सतत राजकीय वक्तव्य करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्याचा परिणामही चांगला दिसत आहे.

दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपले भविष्य चांगले दिसत आहे. त्यामुळेच मुंबईत एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषदांना निवडणूक आपण स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केले नव्हते, मात्र केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन भाजप विरोधी माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्माण सेना उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे आतापासूनच त्यांनी भाजपासह सर्व पक्षांवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्याच्या कितपत फायदा होतो हे आगामी काळात दिसेलच, मात्र पिता पुत्र मैदानात असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमबॅक करणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

नाशिकवर करडी नजर

नाशिक महापालिकेचा महापौर तसेच शहरातील चार पैकी तीन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते, मात्र 2017 च्या निवडणुकीनंतर बोटावर मोजके इतके फक्त पाच नगरसेवक व राज्यात एकच आमदार अशी अवस्था महाराष्ट्र निर्माण सेनेची आहे. तरी नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र निर्माण सेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे पुन्हा नाशिकमध्ये उभारी घेण्याची तयारी पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यंतरी राज ठाकरे यांचे दोन दौरे झाले असून अमीत ठाकरे यांचे सुमारे पाच दौरे नाशिक मध्ये झाले आहे. नाशिकमध्ये नव्याने 122 शाखाप्रमुख यांची नेमणूक करून शाखा नव्हे नाका अशी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे पक्षापासून दूर गेलेले काही वरिष्ठ पदाधिकारी देखील पुन्हा पक्षात आल्यामुळे नाशिकमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या