Friday, May 3, 2024
Homeब्लॉगगर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

दररोज वर्तमानपत्र हातात पडले की, आपल्याला ज्या बातम्या वाचायला मिळतात त्यात एक तरी बातमी ही महिलांवरील अन्याय, अत्याचाराची आपल्याला दिसून येते. स्त्री-पुरुष समानता आली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करू लागली, पण आजही तिला समानतेने वागणूक मिळत नाही. समानतेचा दर्जा दिला जात नाही. वरवर भाषणात समानतेचे गोडवे गाणारेच एक माणूस म्हणून स्त्रीला मान देत नाही. आज समाजात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडताहेत त्या ऐकूनच मन सुंन्न होते. आज माणूस कोणत्या थरापर्यंत जात आहे हा प्रश्न माझ्यासोबतच आपल्यालाही पडला असावा. कारण जसजसा काळ बदलत चालला तसतसे लोकही बदलत चालले आणि बदलायला ही हवे. पण कुठे बदलायला हवं हे आपल्याला कळायलाच पाहिजे.

ज्यावेळेस एखादा अपघात होतो त्यावेळेस त्यातील लोकांना इजा झालेली असते. त्यांना प्रसंगावधान राखून त्यांची मदत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. पण आपण ते कर्तव्य सोडून हातात मोबाईल घेतो आणि व्हिडिओ तयार करण्यात मग्न होतो. तो व्हिडिओ आपण इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सअॅप वरती पोस्ट करून लोकांना मृत्यूचा खेळ दाखवत असतो आणि आपल्याला जास्तीत जास्त लाईक कशा मिळतील याचा आपण विचार करतो. व्हिडिओ बनवून टाकणं आपल्याला महत्त्वाचं वाटतं पण जखमी झालेल्या लोकांना, मृत्यूच्या दाढेत असणाऱ्या लोकांना मदत करणं, त्यांना वाचवणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही. खरंच माणूस दिवसेंदिवस माणुसकी विसरत चालला आहे का? असे वाटते. एवढेच नाही तर ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, हे जग दाखवले, आपल्याला लहानच मोठं केलं, त्याकरता जीवाचा आटापिटा केला आणि खस्ता खाल्ल्या त्या आई-वडिलांना आपण वृद्धाश्रमात सोडतो किंवा काढूनही देतो. जिथे रक्ताच्या नात्याकडून हे हाल होतात तेव्हा दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची. स्वतःच्या स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधून जगाच्या आंधळ्या शर्यतीत पळणाऱ्या या मानव रुपी जनावरांकडून कशाची अपेक्षा करावी.आजकाल माणुसकी ही फक्त सांगायची आणि बोलायची गोष्ट उरली आहे असे वाटते. माणुसकी काय असते हे जर बघायचं असेल तर आपल्याला उदाहरण घ्यावं लागेल ते मदर तेरेसांच, छत्रपती शिवरायांचं, झाशीच्या राणीचं, बाबा आमटेंचं खऱ्या अर्थानं माणुसकी जपण्याचे काम या महामानवांनी केलं. माणुसकी बद्दल तासंतास बोलणाऱ्या पुढार्‍यांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पण आपल्या दाराशी आलेला एखादा गरीब व्यक्ती, उपाशी व्यक्ती त्याला साधी शिळी पोळीही देण्याची दानत ज्यांची होत नाही त्यांनी माणुसकीच्या गप्पा न मारलेल्याच बऱ्या. खरं सांगते,

- Advertisement -

आयुष्य खूप लहान आहे

प्रेमाने गोड बोलत रहा

धनदौलत कोणी कोणाला देत नसतं

फक्त माणुसकी जपत रहा

आपण प्रत्येक जण फार मोठे समाजसेवक किंवा ज्योतिबा फुलेंसारखे नाही होऊ शकत पण किमान आयुष्यात एक तरी माणूस पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन एवढे जरी ठरवलं ना, तरी खूप आहे.

‘दोस्तो’ कवितेचा जन्म

आयुष्यभर आदिवासींसाठी झटत राहिलेल्या अनुताई वाघ खऱ्या अर्थाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा. शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवा हा संदेश त्यांनी कधीच दिला नाही तर ते स्वतःच दिवा होऊन त्यात स्वतःच्या श्रमाचे तेल ओतून ते पेटवून शिक्षणाचा प्रकाश ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला. माणुसकी जपायला शिकावं ते त्यांच्याकडून. दीनदलितांच्या प्रती मानवाच्या मनात असलेली अस्ता म्हणजे माणुसकी. समाजाने झिडकारलेल्या अनेक निराधार, निरागस लेकरांना आपल्या मायेच्या स्पर्शाने आपलंसं करणाऱ्या आणि ज्या अनाथांची माय बनल्या त्या सिंधुताई सपकाळ. ज्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. खरंतर प्रत्येक माणूस हा माणूसच आहे. दुसऱ्या आईच्या उदरात जरी तो जन्मलेला असेल तरी तो आपलाच भाऊ आहे. कारण देवाने सर्व माणसांचं रक्त एकच दिलंआहे. प्रत्येक माणसाने माणसासारखं वागायला हवं आणि माणुसकीला जपायला हवं. अर्जुनालाच भगवान श्रीकृष्णाने गीता का सांगितली असावी. कारण अर्जुन त्या योग्यतेचा होता. पण आपली योग्यता आपल्यालाच माहीत. वृद्धापकाळात आई-वडील आपल्याला नकोसे वाटायला लागतात हे आपलं दुर्दैव. अरे ‘यत्र नारी सस्तू पूज्यतेः रवंते तत्र देवत’.असं एकेकाळी सांगणारी आमच्या भारताची ही थोर संस्कृती आणि आज याच भारतात पुण्यात भर दुपारी तरुण हातात कोयता घेऊन एका मुलीच्या मागे लागतो व ज्या दुकानात ती मुलगी मदत मागायला जाते ते दुकानदार दुकानाचे शटर लावून घेतात. यावरून आपल्याला कळतं जगात किती माणुसकी शिल्लक आहे. धर्म, जात, पंथ यांच्या नावाखाली दंगली पेटतात त्या काही पैशासाठी. आपणच आपल्या लोकांचं नुकसान करतो. पण आम्हाला या गोष्टीचं भानच नाही. कोणी हिंदू असो वा मुस्लिम, ख्रिश्चन असो इतर आपल्या सर्वांना देवानेच बनवले आहे. मग आपल्याला कोणी हा अधिकार दिला भेदभाव, उच्चनीच मानण्याचा. आपण काहीही मनात न ठेवता आपण सर्व एकच आहोत, सर्व समान आहोत हाच भाव आपल्या मनी ठेवायला हवा आणि मुलांमध्ये तो आपण रुजवायलाही हवा. आजही खेड्यापाड्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांची मदत करतात हे विसरून कसे चालेल.

गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

माणसांत सर्व माणुसकी शोधते मी

आहे संस्कृती थोर आपली मानते मी

लागे का गालबोट विचार करते मी

चेहे-यात लपले चेहरे शोधते मी

लावता मुखवटे नकली बोलते मी

आई वडील थोर भूवरी जाणते मी

वृध्दाश्रम नेती ते करंटे मानते मी

जगावे माणसासारखेच मानते मी

डोळे असून आंधळे होते जाणते मी

आनंदी जीवन जगता आले पाहिजे…

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या