Sunday, May 19, 2024
Homeनगरशनीशिंगणापूर पोलीस ठाणे ‘असून अडचण, नसून खोळंबा’

शनीशिंगणापूर पोलीस ठाणे ‘असून अडचण, नसून खोळंबा’

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishingnapur

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कालावधित आ. शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून शनिशिंगनापूर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्यात राज्यात 9 गावे असणार्‍यापैकी व कमी कार्यक्षेत्र असलेले हे पोलीस ठाणे. या निर्मिती मागे हेतू होता तो येथे येणार्‍या अतिमहत्वाच्या व्यक्ती व भाविकांना त्रास न होता सुरक्षित दर्शन घेता यावे. परंतु प्रत्यक्षात हा हेतू साध्यच झालेला नसून हे पोलीस ठाणे असून अडचण नसून खोळंबा बनवलेले आहे.

- Advertisement -

चक्क पोलीस ठाण्याच्या समोरच पोलिसांच्या नाकावर टिच्चून भररस्त्यातच उभे राहून भाविकाच्या वाहनाला आडवे होऊन पूजा साहित्य घेण्यासाठी व पार्किंगसाठी दमबाजी करुन सक्ती केली जाते. परिणामी शिवीगाळ केली जाते.

या टारगट गुंडशाही करणार्‍यांना ना पोलीस अधिकार्‍यांचा धाक, ना दरारा. यामध्ये यांचे काही आर्थिक हितसंबंध आहे की काय? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

या मार्गावर राहुरीपासूनच कमिशन एजंट (लटकू) अतिसुसाट वेगाने मोटरसायकल चालून विशिष्ट दुकानावर पूजा साहित्य घेण्यासाठी जीव धोक्यात घालतात. परिणामी महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनींना अपघातास सामोरे जावे लागते. काहींचा या मार्गावर मृत्यूदेखील झाला आहे. याविषयी सोनई-राहुरी मार्गावरील उंबरे, ब्राह्मणी ग्रामस्थांनी लटकूबाबत आंदोलने व वरिष्ठांना निवेदन देण्यात आले आहे.

शनीची साडेसाती घालविण्यासाठी येणार्‍या भाविकांना दर्शनापूर्वीच शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यासमोरच लटकू दलालांच्या साडेसातीला सामोरे जावे लागत असल्याचे दुर्देवी चित्र दिसून येत असल्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शनिची साडेसाती मिटविण्यासाठी राज्यासह परराज्यातून दिवसागणिक हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने शनिशिंगणापुरात येत असतात त्यामुळे भाविकांच्या जीवावर पोट भरणारी मंडळी वेगवेगळ्या कारनाम्याखाली भाविकांना भुरळ घालून फसविण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधून भाविकांची लुट करताना दिसून येत आहेत त्यामुळे शनीची साडेसाती मिटविण्यापूर्वीच दलालांच्या साडेसातीला भाविकांना सामोरे जावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र येथे पहावयास मिळत आहे. भाविकांच्या एका गाडीमागे चार -पाच मोटारसायकलवरुन सुसाट वेगाने चालवून भाविकांना सोयीसुविधेचा बागुलबुवा दाखविण्याचा बहाणा करून अडविण्याचा प्रकार केला जात आहे.

भाविकांनी लटकू दलालांच्या इशार्‍यावर गाडी थांबविली नाहीतर भाविकांना दमदाटीही करण्याच्या घटना घडताना दिसून येतो. वाहने चक्क पोलीस ठाण्यासमोरच अडविण्यात येत असून पोलीस एक चकार शब्दही लटकुंना उच्चारत नसल्यामुळे लटकुंच्या दादागिरीपुढे पोलीसच त्यांना नतमस्तक होत असल्याच्या प्रतिक्रिया भाविक भक्तांतून व्यक्त होताना दिसत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी पुढाकार घेऊन शनिची साडेसाती मिटविण्यासाठी आलेल्या भाविकांना लटकुंच्या दादागिरीतून मुक्त करण्याची मागणी भाविकांतून केली जात आहे.

पोलिसांनी नांग्या टाकल्याचे गुढ !

राज्यासह परराज्यातून येणार्‍या भाविकांच्या वाहनांचा दलाल 15-20 किलोमीटरपासून पाठलाग करुन पुजा साहित्य व वाहन पार्किंगच्या नावाखाली वाहनांच्या गाड्या अडविण्याचा सर्रास प्रकार चक्क येथील पोलीस ठाण्यासमोर होताना दिसत असून पोलीस डोळे असून आंधळे बनल्याचे पहावयास मिळत आहे. दलालांच्या कारनाम्यापुढे पोलिसांनी नेमक्या नांग्या का टाकल्या? असा सवालही सध्या भाविक भक्तांमधून विचारला जात आहे. ज्या हेतूसाठी ठाण्याची निर्मिती झाली तोच हेतू जर साध्य होत नसेल तर शनीशिंगणापूर पोलीस ठाणे काय कामाचे? असा सवाल नागरिक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या