Monday, May 6, 2024
Homeनगरपाच महिन्यांत 428 हातभट्ट्या उद्ध्वस्त

पाच महिन्यांत 428 हातभट्ट्या उद्ध्वस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मागील चार-पाच महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील 428 हातभट्टीवर छापेमारी करत 343 जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईदरम्यान 70 लाख 36 हजार 541 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी (2022) 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट दरम्यान 202 ठिकाणी छापेमारी करून 36 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यंदा यामध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी गावठी (हातभट्टी) दारूच्या भट्ट्या सर्रासपणे सुरू असतात. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशाप्रकारच्या गावठी दारूच्या भट्ट्या चालवतात. ही हातभट्टी बेकायदेशीर असते. ही दारू तयार करण्यासाठी अतिशय जीवघेण्या पदार्थांचा वापर केला जातो. ही दारू अतिशय विषारी असते. त्यामुळे अशा भट्ट्यांमधील दारू पिवून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधी अनेकदा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. पण तरीही या हातभट्ट्या काही कमी होत नाहीत. याउलट या भट्ट्यांची संख्या वाढत जाते.

या भट्ट्यांमुळे प्राण गमावणार्‍या नागरिकांच्या कुटुंबांचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कने जिल्ह्यातील पाच विभागांसह दोन स्वतंत्र भरारी पथकांनी पाच महिन्यांत हातभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.

हातभट्टी मुक्त गाव अभियान

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सध्या हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणार्‍या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुणे येथे अधिकार्‍यांची बैठक घेतली आहे.

बिनधास्त करा तक्रार

ग्रामीण भागात हातभट्ट्यांचे मोठे जाळे आहे. हातभट्टी निर्मिती करणारे व विक्री करणारे यांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यांची तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. मात्र यापुढे अशा हातभट्टीची तक्रार टोल फ्री क्रमांक 18002339999 तसेच 022-26026058633 या अथवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8422001133 या नंबरवर संपर्क करून द्यावी. तक्रार देणार्‍याचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या