Sunday, May 19, 2024
Homeनगरइथेनॉल बंदीचा ऊस दरावर परिणाम नाही

इथेनॉल बंदीचा ऊस दरावर परिणाम नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशातील साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती बंदीचा ऊस दरावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनूसार शेतकर्‍यांना दर द्यावे लागतील. इथेनॉल बंदीचा विषय थेट शेतकर्‍यांशी निगडीत नाही, यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

नगरमध्ये ते माध्यमाशी बोलत होते. यावेळी विरोधकांवर टीका करतांना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, अनेक लोकांना भास व गैरसमज होत आहेत. ते दिवसा स्वप्न पाहात आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा मनपाने सुरू केलेल्या एमआरआय सेंटरमध्ये जाऊन मेंदू तपासून घ्यावेत. त्याचे फोटो घेऊन माझ्यासारख्या न्यूरोसर्जन डॉक्टरला दाखवा व गैरसमज दूर करून घ्या. वेळ पडल्यास मी त्यांचा इलाज करू शकतो व अजूनही वेळ गेलेली नाही, असा सूचक टोला खा. डॉ. विखे यांनी लगावला.

नगर महापालिकेच्या सावेडीतील सावित्रीबाई संकुलात मनपाच्या एमआयआय सेंटरचे उद्घाटन खा. डॉ. विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. माझ्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मनपाचे बहुतांश सर्व नगरसेवक आले. अर्थात प्रत्येकजण माझा मित्र आहे. फोनद्वारे वा मेसेजद्वारे माझ्या संपर्कातही सारे आहेत. पक्ष व चिन्ह वेगळे असले तरी नगर विकासासाठी आम्ही एक आहोत, असे त्यांनी दाखवून दिल्याने त्यांना धन्यवाद असे म्हणत खा. विखेंनी दोन्ही हात जोडल्याने तोही चर्चेचा विषय झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अ‍ॅडव्हान्स हेल्थकेअर मोहिमेंतर्गत सर्वांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगून खा. डॉ. विखे म्हणाले, सिव्हीलमध्ये 18 कोटींची कॅथलॅब येत्या वर्षभरात उभारून मोफत अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी सुविधा देणार आहे. मनपाद्वारे 500 रुपयात सीटी स्कॅन सुविधा दिली जाणार आहे. दीड हजार रुपयात एमआरआय सेवा सुरू केली आहे. विकासात कमी-जास्त होऊ शकते, पण, मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी डॉक्टर असलेल्या खासदाराने घेतली आहे, असे स्पष्ट करून खा. डॉ. विखे म्हणाले, 10 वर्षात जे घडले नाही, ते अवघ्या दोन वर्षात नगर शहरात झाले आहे व यासाठी आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे व सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळाले आहे.

नगर बदलणार व चांगल्या दिशेने नेणार असून, येत्या 5 वर्षात औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) व नाशिक आधी नगरचे नाव असेल, असे काम आम्ही सर्व मिळून करणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नगर बायपास व करमाळा रस्त्याचे लोकार्पण 1 जानेवारीला करण्याची घोषणा त्यांनी केली व 15 कोटी रुपये खर्चून सावेडीतील सामाजिक न्यायभवनासमोरील मनपाच्या 40 गुंठे जागेत अत्याधुनिक एसी ग्रंथालय उभारून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना सुविधा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या उतरण्याने-चढण्याने फरक पडणार नाही

कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहे. यावर उत्तर देताना खा. डॉ. विखे यांनी खोचक टोला लगावला. त्यांना कुठेही उतरू द्या, त्यांच्या उतरण्याने अथवा त्यांच्या चढण्याने काही एक फरक पडणार नाही. महायुती सरकार शेतकर्‍यांशी प्रामाणिक आहे. सरकारने आतापर्यंत वेळोवेळी शेतकर्‍यांना मदतीचे निर्णय घेतले असल्याने आणि केंद्र सरकार पाठीशी असल्याने येत्या दोन दिवसांत यातून मार्ग निघेल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. तर, 45 प्लस खासदारात आपण असू, या प्रा. राम शिंदे यांच्या दाव्यावर नो कॉमेंटस असे भाष्य करून उत्तर देणे त्यांनी टाळले.

कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरू

मराठा आरक्षणावर कोणीही संयम सोडून बोलू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलेले आहे. मराठा समाज संयमाने आंदोलन करत आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षाने, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांनी मराठा आरक्षणावर जपून बोलावे, असे आवाहन खा. विखे यांनी केले. तसेच कुणबी नोंदी तपासणे काम सुरू असून अनेक ठिकाणी कुणबीचे दाखले वितरण सुरू आहे. यावर लवकरच मुख्यमंत्री शिंदे आकडेवारी जाहीर करतील. जामखेड तालुक्यातील 13 गावातील कुणबीचे नावे बीड जिल्ह्यात असून याबाबत प्रशासनाला अवगत करण्यात आले असून त्याठिकाणाहून कागदपत्रे नगर जिल्ह्यात मागवण्यात येणार असल्याचे खा. डॉ. विखे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या