Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनवीन अभ्यासक्रमाची पुस्तके जानेवारीत

नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके जानेवारीत

नाशिक । प्रतिनिधी

तिसरी आणि बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत हे काम अंतिम टप्प्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात नवीकोरी पुस्तके पडणार आहेत. येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बारावीची सर्व विषयांची नवीन पुस्तके बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पहिलीपासून बारावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके बालभारती तयार करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विषयतज्ज्ञांकडून नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या कोणत्या घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असावा, याबाबत अभ्यास मंडळातील सदस्य चर्चा करत आहेत.

अभ्यासक्रमाचे काम डिसेंबर महिनाअखेरपर्यंत अंतिम टप्प्यात येणार आहे. त्यानंतर विषयतज्ज्ञ व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येकी दोन शिक्षकांसमोर नवीन अभ्यासक्रम ठेवला जाईल. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या विविध प्रक्रियेतून सर्व विषयांची पुस्तके गेल्यानंतर ही पुस्तके छपाईसाठी दिली जातील.

इयत्ता बारावीच्या गुणांवर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षा अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. नव्याने तयार होणार्‍या बारावीच्या पुस्तकांमध्ये या प्रवेशपूर्व परीक्षांना पूरक असणार्‍या घटकांचा समावेश केला जात आहे.

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून पुस्तके तयार केली जात आहेत. विज्ञान व गणित या विषयांच्या पुस्तकांवर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता तिसरीपेक्षा बारावीची पुस्तके बाजारात लवकर आणली जाणार आहेत.

बालभारतीकडून यंदा इयत्ता तिसरी व बारावीची नवीन पुस्तके तयार केली जात आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांकडून नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीच्या संचालकांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या