Friday, May 3, 2024
Homeनगररेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे

रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे

आमदार आशुतोष काळे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या मंडल अधिकार्‍यांना दिले पत्र

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर मागील काही महिन्यांपासून रेल्वे क्रॉसिंग गेटच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. ते काम आजही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या अपूर्ण कामाचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत असून हे अपूर्णावस्थेतील भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे मंडल अधिकारी हितेंद्र मल्होत्रा यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisement -

या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून दौंड-मनमाड रेल्वेमार्ग जात आहे. या दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर यापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग गेट होते त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने तर काही ठिकाणी हे काम थांबलेले आहे.

या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून पूर्वीचे रेल्वे क्रॉसिंग गेट कायमस्वरूपी बंद केले आहे. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंग गेटचा वापर करणार्‍या नागरिकांना व वाहनधारकांना भुयारी मार्गातून गेल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. एकीकडे भुयारी मार्गाचे अपूर्ण असलेले काम व दुसरीकडे गेट बंद याचा दुहेरी त्रास नागरिकांना व या रेल्वे क्रॉसिंगवरून जाणार्‍या वाहनधारकांना होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गालगत संबंधित ठिकाणी या भुयारी मार्गाचे काम अपूर्णावस्थेत असल्यामुळे यापूर्वी रेल्वे क्रॉसिंग गेटमधून ये-जा करणार्‍या नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी अपूर्णावस्थेत असलेल्या या भुयारी मार्गामध्ये चार ते पाच फूट पाणी साचलेले आहे. त्यामुळे पादचारी, शाळेत जाणारे विद्यार्थी व नागरिकांना या पाण्यातूनच जावे लागत असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यातून जाण्याचा त्रास वाचावा यासाठी परिसरातील नागरिक रेल्वे क्रॉसिंग पार करून गेले तर रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारते.

रेल्वे भुयारी मार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून कामाबाबत दिरंगाई होत असल्यामुळे या भुयारी मार्गाचे काम रखडलेले आहे. जोपर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्वीचे गेट सुरु ठेवावे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे त्या भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करावी, असे दिलेल्या पत्रात शेवटी आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या