Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच – छगन भुजबळ

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच – छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची भाजपने ऑफर दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र ग्रामविकासमंत्री तथा पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशान्वये राज्यातील सत्तेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीला आमिषही दाखवले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-काँग्रेससोबतच राहणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

भुजबळ यांनी बुधवारी भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेबाबत भुजबळ यांना विचारले असता, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्याप्रमाणे येथे महाविकास आघाडी करावी, असे आदेश दिले आहेत. यात ज्या पक्षाचे सदस्य अधिक त्यांचा अध्यक्ष, दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पक्षाला उपाध्यक्षपद देण्यात यावे, असे निर्देश आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदानंतर सभापतिपदे वाटून घ्यावी, असे निश्चित झाले आहे.

या आदेशानुसारच जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल. भाजपने अध्यक्षपदासाठी ऑफर दिली असली तरी त्यास पक्ष बळी पडणार नसल्याचे त्यांंनी स्पष्ट केले. पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र सत्तावाटपात प्रत्येक सदस्याला पद मिळेल असे नाही. पदे देताना सामाजिक, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील नेते याबाबत निर्णय घेतील. महाविकास आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात बैठक घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत, असेही भुजबळांनी सांगितले. दरम्यान, भुजबळ यांनी महाविकास आघाडीच होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेचा अध्यक्ष व राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे.

इच्छुकांकडून प्रयत्न सुरू
राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपद येणार असल्याने या पदासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यात अनेक इच्छुकांनी भुजबळ यांची भेट घेतली, तर माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी अनेकांनी बंद दरवाजाआड चर्चा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या