Friday, May 3, 2024
Homeनाशिकअवकाळी अनुदानाचे ७८ टक्के शेतकर्‍यांना वाटप

अवकाळी अनुदानाचे ७८ टक्के शेतकर्‍यांना वाटप

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील अवकाळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून दोन टप्पे मिळून ५७८ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ५ लाख १० हजार शेतकर्‍यांना ४५५ कोटी ५५ लाखांचे अनुदान वाटप झाले आहे. एकूण प्राप्त निधीपैकी ७८ टक्के निधीचे वाटप झाले आहे. अद्याप अडीच लाख अवकाळी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे. येत्या बुधवार (दि.१५) पर्यंत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यात ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. त्यापैकी ४ लाख ९ हजार २७५ हेक्टर जिरायत क्षेत्रावर नुकसान झाले. बागायती पिकाचे नुकसान हे १ हजार ३६१ गावांमध्ये झाले आहे. तर बहुवार्षिक फळपिकांचे ८१ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ५७३ कोटी ४ लाख ९२ हजारांंच्या निधीचा प्रस्ताव पाठविला होता.

त्यात पहिल्या टप्प्यात १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचे वाटप करण्यात आल्यानंतर आता शेवटच्या दुसर्‍या टप्प्यातील ३९६ कोटी ६२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे अनुदान प्राप्त होऊन एक महिना लोटला असून ३१ डिसेंबरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्याप शंभर टक्के निधी वाटप होऊ शकला नाही.

जिल्ह्यात मालेगाव,नाशिक,त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांमध्येच मदतीचे वाटप जवळपास ९० टक्कयांच्या पुढे गेले आहे. तर बागलाण,कळवण,दिंडोरी,देवळा व येवला या तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत मदत वाटप झाली असून उर्वरित तालुक्यांमध्ये मदत वाटपाचे प्रमाण हे साठ टक्कयांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५७८ कोटी १३ लाख २९ हजार रुपयांंच्या अनुदानापैकी ४५५. कोटी २५ लाख अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून बँकांना येत्या १५ जानेवारीपर्यंत मदत निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या