Monday, May 6, 2024
Homeनगरव्हायरल चित्रफितीतून पोलिसिंगच्या ‘वृत्ती’चे दर्शन

व्हायरल चित्रफितीतून पोलिसिंगच्या ‘वृत्ती’चे दर्शन

कोतवाली, तोफखाना पोलिसांचे कारनामे उघड

अहमदनगर – कोतवाली पोलिसाने डंपर सोडण्यासाठी घेतलेले पैसे, तोफखाना पोलिसांच्या वाहनांच्या अपघातानंतर केलेल्या शिवीगाळीचे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले चित्रीकरण हे नगर शहर पोलिसिंगच्या खर्‍या ‘वृत्ती’चे दर्शन घडवीत असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे. पोलिसांच्या या वृत्तीची शहरात थंडीच्या वातावरणात गरमागरम चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

पोलिसांशी समाजभिमुख कसे व्हावे, यासाठी पोलीस दलांनी राज्यभर रायझिंग-डे नुकताच उत्साहात साजरा केला. शहर व जिल्हा पोलिसांनी देखील त्यात विविध उपक्रम केले. रायझिंग-डे संपतो ना संपतो तोच खाकीवर शिंतोडे उडले गेले. या प्रकाराला खाकीतील पोलीसच कारणीभूत ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यात प्रभावी ठरले ते समाज माध्यम आणि त्याचा वापर करणारे डेअरिंगबाज! कोतवाली पोलिसाने डंपर सोडण्यासाठी कसे पैसे घेतले, याची कहाणी एकाने चित्रीत करून ती समाज माध्यमांवर व्हायरल केली. हा प्रकार थंड होत नाही तोच, तोफखाना पोलिसांकडून मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर परिसरात केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर चित्रफितीत व्हायरल झाली. दोन्ही घटना पोलिसांच्या पोलिसिंगला शोभत नाहीत हे एवढे खरे.

एका हाताने टाळी वाजत नाही, नाण्याला दुसरी बाजू असते, असे बोलून पोलिसांनी बाजू सावरली खरी पण, समाज माध्यमांनी उघडकीस आणलेल्या पोलिसिंगच्या प्रवृत्तीचे काय? असा सवाल केला जाऊ लागला आहे. ही क्लीप पुन्हा कधी ना कधी बाहेर येईल. त्यामुळे वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन प्रवृत्ती रोखली पाहिजे, अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत. भ्रष्टाचाराने पोलीस दल पोखरलेले आहे. पैसे दिल्याशिवाय काहीच काम होत नाहीत, असेही सर्रास पोलीस दलाविषयी बोलले जाते.

पोलिसांवर कसा विश्वास नाही, याचे वरिष्ठ पोलीस अधिकारीच व्याख्यानांमध्ये उदाहरणे सांगतात. दिवसेंदिवस पोलीस दलाची बिघडत चाललेली ही प्रतिमा कायदा व शांततेसाठी घातक अशीच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात लाचेच्या जाळ्यात सर्वाधिक पोलीस अडकतात. नगरमध्ये गेल्या काही महिन्यांत पाहिल्यास नगर शहरासह ग्रामीण भागात लाचेच्या सापळ्यात सर्वाधिक पोलीस अडकले आहेत.

त्यावरून पोलिसांच्या पोलिसिंगविषयी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफिती त्यांच्या खाबुगिरीच्या वृत्तीचे दर्शन घडवीत असल्याची चर्चा सुरू आहे.

पोलखोलसाठी समाज माध्यम प्रभावी !
पोलिसांच्या या वृत्तीची पोलखोल करण्यासाठी लोकांच्या हाती समाजमाध्यम हे प्रभावी हत्यार सापडले आहे. तसे हे हत्यार दुधारी आहे. परंतु अशा वृत्तीची पोलखोल करण्यास सध्या तरी सरस ठरत आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांच्या पराक्रमाची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीद्वारेच घेतली होती. त्यांना निलंबित केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या