Friday, May 3, 2024
Homeनाशिकबाल येशू यात्रोत्सवास प्रारंभ

बाल येशू यात्रोत्सवास प्रारंभ

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिक-पुणे मार्गावरील सेंट झेवियर्स स्कूलच्या आवारातील बाल येशूच्या दोन दिवसीय यात्रेला  उत्साहात प्रारंभ झाला. शिस्त, उत्तम संयोजन, सुरक्षा यामुळे यात्रेला काल दिवसभरात सुमारे दीड ते दोन लाख ख्रिस्ती भाविकांनी हजेरी लावली. काल सकाळी ६ वाजेपासून मिसाला सुरुवात झाली. शाळेच्या मैदानावरील मुख्य शामियानात मिसा (प्रार्थना) घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर तासाला मिसाची व्यवस्था करण्यात होती.

- Advertisement -

मराठी, हिंदी, तामीळ व इंग्रजी भाषेत फादर पवित्र मिसा देत आहेत. यात मुंबईचे कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस यांनी संदेश दिला. देशभरातून दोनशे फादर, तीनशे सिस्टर उपस्थित होते. मिसानंतर भाविक येशूच्या दर्शनाला जात होते. भाविकांना मार्गदर्शन करताना नाशिक ख्रिस्ती धर्मप्रांत प्रमुख फादर ल्यूडस् डॅनियल यांनी मुख्य मिसा दिली. ते म्हणाले की, प्रभूवर ज्याचे प्रेम व श्रध्दा असते त्यांनी आपली इच्छा प्रभूकडे मांडल्यावर प्रभू ती नक्कीच पूर्ण करतो. संकट, समस्या निवारण करतो. प्रभूने सांगितलेल्या सत्याच्या मार्गावर चला. दुसर्‍यांवर प्रेम करा.

झेकोस्लोव्हाकिया देशातील प्राग येथे बाळ येशूचे मुख्य मंदिर आहे. भारतात फक्त नाशिकरोड येथेच असे मंदिर आहे. फादर पीटरनीस यांनी १९६९ साली नाशिकरोड यात्रेची सुरुवात केली. मंदिरात प्रवेशाचा व बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. बाळ येशू यात्रेत विविध खेळणी, वस्तू यांचे स्टॉल्स लागलेले आहेत. मेणाची खेळणी वाहून नवस केल्यास बाळ येशू मनोकामना पूर्ण करतो अशी श्रध्दा आहे. त्यामुळे अनेक भाविक नवस करताना दिसत होते. आजारपण, संतती, विवाह, नोकरी आदी समस्या निवारणासाठी नवस करणारे भाविक अधिक आहेत. कन्फेशन (प्रायश्चित) सेंटर येथेही भाविकांची गर्दी होत आहे.

मध्य रेल्वेने मुंबईहून काल विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातून सकाळी यात्रेकरु मोठ्या संख्यने दाखल झाले. देशभरातून अनेक भाविक खासगी वाहनांतून आले. पार्किंगची व्यवस्था जेतवननगर, जयभवानीरोड, नेहरुनगरमधील केंद्रीय विद्यालय परिसर, उपनगर परिसरात करण्यात आली आहे. तेथील पार्किंगही फुल्ल झाले आहे. यात्रा काळात नाशिक-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टळली आहे. स्टॉल्सवर वस्तू, फळे घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नाशिकची द्राक्ष भाविक खरेदी करताना दिसत होते. भाविकांसाठी मंदिर मागील जुन्या व नव्या सभागृहात व्यवस्था करण्यात आल्यामुळे त्यांची सोय झाली आहे.

यात्रा शांततेत पार पडावी म्हणून उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांना वाहतूक पोलीस व स्वयसेवंकांचीही मोठी मदत मिळत आहे. गर्दीचा गैरफायदा घेत चोरांनी भाविकांची पाकिटे, मोबाईल, महत्त्वाच्या वस्तू लांबवल्या. आज (दि.९) यात्रेचा समारोप असून सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मिसा होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या