Friday, May 3, 2024
Homeनगरकर्जतचे चार पोलीस कर्मचारी निलंबित

कर्जतचे चार पोलीस कर्मचारी निलंबित

उपकारागृहातून आरोपी पलायन प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत येथील उपकारागृहातून एकाचवेळी पाच खतरनाक आरोपींनी पलायन केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती. यावेळी कारागृहात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी कर्तव्यात कसुर केला म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी चौघा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.

- Advertisement -

याबाबत सोमवारी दुपारी अधीक्षक पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला. पोलीस नाईक रावसाहेब दशरथ नागरगोजे, जालिंदर काशिनाथ माळशिकारे, दीपक शिवमूर्ती कोल्हे, देविदास सोपान पळसे यांना निलंबित करण्यात आले आहे. उपकारागृहातून 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पाच गंभीर गुन्ह्यातील आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप या पाच आरोपींनी जेलच्या छतावरील गज कटरच्या सहाय्याने कापले त्यानंतर कौल काढले आणि या पाचही आरोपींनी पलायन केले होते. पलायन केलेल्या पाचपैकी ज्ञानेश्वर कोल्हे, मोहन भोर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथे अटक केली.

तर, गंगाधर जगताप याला कर्जत पोलीसांनी महाळंगी (ता. कर्जत) येथे अटक केली होता. तर, अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत हे दोघे आरोपी अद्याप पसार आहेत. घटना घडल्यानंतर नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी उपकारागृहाला भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या होत्या. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. पाटील यांनी या घटनेच्या वेळी कारागृहात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची चौकशीसाठी तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर केला, निष्काळजीपणा दाखवला व हलगर्जीपणा केला म्हणून चारही पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या