Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedमनोरुग्णांना म्हणावे आपले !

मनोरुग्णांना म्हणावे आपले !

मनोरुग्णांना बरे करण्यात, त्यांना जीवनाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुटुंबियांबरोबरच आपण भोवतालच्या समाजानेही हातभार लावायला हवा. व्यक्ती, समाज आणि देशाच्या मानसिक आरोग्यासाठी आपण हे काम करायला हवे.

सुरेखा टाकसाळ

- Advertisement -

तू वेडा आहेस का? तो डोक्यावर पडला आहे, असे उद्गार आपल्या कानावर अनेक वेळा पडतात. साधारणत: सामान्य रितीभाती, वागणे-बोलणे, विचार यांच्या चाकोरीत न बसणारे, अव्यवहार्य असे मत किंवा वर्तणूक कुणाला दिसली तर अशा व्यक्तीवर वेडाचा शिक्का मारला जातो. एखाद्याने भन्नाट कल्पना मांडली की तो ‘येडचॅप’ असतो. अगदी गॅलिलिओ व न्यूटन ज्यांनी सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सफरचंदच नाही तर गुरुत्वाकर्षणामुळे कुठलीही वस्तू वरून खाली पडते असे सिद्धांत मांडले त्यांनादेखील त्यांच्या काळात वेड्यातच काढण्यात आले होते.

वेडेपणाच्या काही भ्रामक कल्पना, व्याख्या, खुळ्यांनीच केल्या असाव्यात. वास्तविक वेडेपणा हे मानसिक ताणतणावाचे, आजाराचे लक्षण आहे, असे विज्ञान सांगते. परंतु काहीजण केवळ परिस्थितीतून सुटायला म्हणून वेड पांघरून पेडगावला जातात, हेही काही खोटे नाही. कोणतीही व्यक्ती ‘वेडी’ नसते. क्वचित तिची आकलन शक्ती कमी किंवा वेगळी असू शकते. मानसिक ताणतणाव, न्यूनगंड, दडपण, भेदभावाची वागणूक, सतत इतरांबरोबर केली जाणारी तुलना, अपेक्षाभंग अशा अनेक कारणांमुळे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी होते. मनोरुग्ण बनते. मनोरुग्ण जगात सर्वच समाजांमध्ये व देशांमध्ये आहेत.

2017 मध्ये देशात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती विविध प्रकारच्या मानसिक आजाराने ग्रस्त होती. 1990 च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट होते. गेल्या तीन वर्षांमध्ये ही संख्या आणखी वाढली आहे. भारतातील मनोरुग्णांमध्ये डिप्रेशन (नैराश्य), एन्ग्झायटी (चिंता), स्किझोफ्रेनिया (छिन्न मनस्कता), विकृतीमुळे लोक सर्वाधिक ग्रस्त आहेत. लैंसेट साईकेट्री रिपोर्टनुसार 2017 मध्ये 19.80 कोटी लोक मानसिक आजारांनी ग्रासलेले होते. यात साडेचार कोटी लोक डिप्रेशन व स्किझोफ्रेनियाचे रुग्ण होते.
मानसिक रुग्णांची संख्या मोठी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक रोगांकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

वास्तविक सर्वसामान्य आरोग्य चिकित्सा सेवांमध्ये मानसिक आरोग्य सेवांचा समावेश व्हायला हवा. देशाने जुलै 2017 मध्ये पहिला मानसिक आरोग्य कायदाही केला आहे. मनोरुग्णांच्या प्रतिष्ठेचे रक्षण तसेच त्यांच्यावरील उपचारांदरम्यान गोपनियता राखण्याचा यात समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारत व त्याखालोखाल चीन आणि अमेरिकेमध्ये एन्ग्झायटी, स्क्रिझोफ्रेनिया व बायपोलर डिसऑर्डर द्विधु्रवी विकृती या मनोविकारांनी ग्रस्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. डिप्रेशनबाबत आकडेवारीनुसार, भारत हा मोस्ट डिप्रेस्ड नेशन आहे !

ही जेवढी धक्कादायक तितकीच खेदाची आणि विचार करण्याजोगी बाब आहे. बंगळुरू येथील निमहान्स (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्सेस)ने पाच वर्षांपूर्वी नॅशनल मेंटल हेल्थ तपासणी केली असता 13 ते 17 वयोगटातील 9.8 दशलक्ष (98 लाख) मुले-मुली डिप्रेशन व अन्य मानसिक आजारांनी ग्रस्त होते व त्यांची तपासणी व उपचार करणे अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष काढला होता.

भारताची लोकसंख्या 145 कोटी आहे आणि देशात डॉक्टर्सची संख्या 9 लाख 36 हजार आहे. यापैकी फक्त 4500 डॉक्टर्स सायक्रिअ‍ॅट्रिस्ट (मनोविकारतज्ज्ञ) आहेत. प्रत्यक्षात देशाला गरज आहे अशा 13 हजार डॉक्टरांची, याव्यतिरिक्त देशात 20 हजर 250 सायकॉलॉजिस्ट-समुपदेशकांचीही अत्यंत आवश्यकता आहे आणि प्रत्यक्षात आहेत फक्त 898!
जागतिक मानसिक आरोग्यदिनी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, जगात सर्वाधिक आत्महत्या (37.6 टक्के) भारतात होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. खासकरून चिंता विकृती (एक्झायटी) आणि नैराश्य! लैंगिक अत्याचार, बलात्कार यांचा धक्का, प्रसूतीनंतर येणारे नैराश्य तसेच सर्व बाजूंनी वाढत्या अपेक्षा आणि दबाव, आरोग्याबाबत सुसंवाद चर्चेच्या सोयींचा अभाव इत्यादी कारणांमुळे महिलांना नैराश्य येऊ शकते. आत्महत्येचे ते कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संशोधनानुसार 20 टक्के भारतीय माता या प्रसूतीनंतर होणार्‍या डिप्रेशनच्या शिकार होण्याची शक्यता आहे. याच संस्थेच्या संशोधनाने, भारतातील मानसिक आरोग्याच्या परिस्थितीच्या कारणामुळे 2013-2030 दरम्यान या देशाचे सुमारे 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतके आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मनोरुग्णांच्या उपचारांसाठी, त्यांचे मानसिक आजार बरे, कमी करण्यासाठी आपल्या देशात सोयींची कमतरता आहे. हे खरे असले तरी काही निवडक राष्ट्रीय संस्था, राज्यस्तरावरील इस्पितळे त्याबाबत चांगली कामगिरी करीत आहेत. बंगळुरू येथील निमहॅन्स ही जागतिक दर्जाची नावाजलेली राष्ट्रीय संस्था आहे. चंदिगड व रांची येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकिअ‍ॅट्रीदेखील राष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, ठाणे व रत्नागिरी येथे अशा संस्था व इस्पितळे कार्यरत आहेत.

नागपूर येथील रिजनल मेंटल हॉस्पिटल हे अत्यंत जुने 1884 मध्ये स्थापन झाले. त्यावेळी ते ‘पागलखाना’ या नावाने ओळखले जायचे. मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या इस्पितळात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. आदर्श मानसिक रुग्णालयाचे स्वरूप त्याला दिले जात आहे. विदर्भातील 8 जिल्ह्यांबरोबरच राज्यातील इतर भाग व मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून येथे मनोरुग्ण येतात. त्यांना आणले जाते. त्यांच्या मनोविकारांच्या अवस्थेनुसार त्यांना पाच वॉर्डस्मध्ये ठेवले जाते. सुमारे 940 खाटांची येथे व्यवस्था असून टाटा कंपनीच्या ‘उडान’बरोबर कराराअंतर्गत मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाते.

या इस्पितळाच्या प्रमुख संचालिका डॉ. माधुरी थोरात यांनी सांगितले की, पेशंटना कोर्टाद्वारे येथे प्रवेश दिला जातो. अनेकांना टी. बी., कावीळ किंवा एच.आय.व्ही. झालेला असतो, कुपोषितही असतात. कुणी मारहाण झालेले, जखमा झालेले असतात. सर्वांवर उपचार केले जातात.
रुग्णांना उपचारांसोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी क्षमता लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळी कौशल्य कामे (स्किल्स) शिकवली जातात. त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेण्यात येतात. त्यांना घरकामेही शिकवली जातात. रुग्ण बरा झाल्यानंतर घरी गेल्यानंतर कुुटुंबियांना त्याचे ओझे वाटू नये हा त्यामागे हेतू असतो. दर महिन्यात होणार्‍या कोर्टाच्या मीटिंगमध्ये कुणाला डिस्चार्ज द्यायचा, कुणाला कसे हाताळायचे याचा निर्णय सिव्हिल ज्युडिशियल, मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत केला जातो.

बरे झालेले काही घरी परततात तर काहीजण ‘घरी नको’ असेही म्हणणारे आहेत. काही रुग्णांना डे केअर सेंटरमध्ये पाठवले जाते. परंतु ‘शेल्टर होम’मध्ये अशा रुग्णांचा स्वीकार कमी आहे. मनोरुग्णांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांचे मानसिक प्रशिक्षण या इस्पितळात केले जाते. रुग्णाची औषधे, त्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवले जाते. मनोविकारांबद्दल लोकांमध्ये जाणीव, जागरुकता वाढते आहे. मनोरुग्णांवर उपचार केले तर ते बरे होऊ शकतात हे लोकांना समजू लागले आहे, असा डॉ. थोरात यांचा अनुभव आहे.मनोविकारांवर उपचार घेणार्‍यांपैकी एक तृतीयांश व्यक्तींमध्ये त्यांचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. एक तृतीयांश रुग्ण हे आयुष्यभर सतत औषधांमुळे सुधारतात. परंतु एक तृतीयांश रुग्णांवर कालांतराने औषधांचा गुणकारी परिणाम होत नाही, असाही अनुभव आहे.

महिला, नवतरुण युवकांप्रमाणेच शेतकर्‍यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विदर्भ भागात तर अधिकच. नागपूरचे हे इस्पितळ त्यास अपवाद नाही. येथे असे अनेक पेशंटस् येतात. उपचारांबरोबरच त्यांचे समुपदेशन केले जाते. अशाच एकाने आत्महत्येचा वीसवेळा प्रयत्न केला. पण दरवेळी तो फसला. आता या तरुणाने एमपीएससीची परीक्षा दिली असून तो ‘रोल मॉडेल’ बनला आहे! या इस्पितळाने त्याची एक चित्रफित तयार केली आहे. मनोरुग्णांना बरे करण्यात, त्यांना जीवनाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुटुंबियांबरोबरच आपण भोवतालच्या समाजानेही हातभार लावायला हवा. व्यक्ती, समाज आणि देशाच्या मानसिक आरोग्यासाठी!

- Advertisment -

ताज्या बातम्या