Friday, May 3, 2024
HomeUncategorizedविद्यार्थ्यांना लागणार वाचनाची गोडी

विद्यार्थ्यांना लागणार वाचनाची गोडी

ग्रंथालय विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण

सिन्नर । अजित देसाई

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या मान्यतेने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये ग्रंथालय विकास कार्यक्रमाची अंलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२३ पर्यंत हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन असून त्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मदतीने ‘रीड टू रूम इंडिया ट्रस्ट’ या संस्थेकडून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. ते आपापल्या शाळेत वाचनालय प्रभारी म्हणून भूमिका पार पाडणार आहेत.
शिक्षकांच्या मदतीने शाळेत बालस्नेही वाचनालयाच्या माध्यमातून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा ग्रंथालय विकास कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी शिक्षकांना वाचनालयाचे उत्तम व्यवस्थापन करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत केंद्रस्तरावर वाचनालय स्थापन करून प्रत्येक वाचनालयात मुलांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुलांसाठी वाचन व पुस्तक वाचन कृती घेणे, मुलांचे आदर्श वाचन नमुने, वाचन उपक्रमामध्ये मुलांची पुस्तकासोबतची जवळीकता साधणे याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे. नाशिक मध्ये या उपक्रमाची अमंलबजावणी आर.जी. मनुधने फाउंडेशन फॉर एक्सलन्स या संस्थेमार्फत रीड टू रूम इंडिया ट्रस्ट करणार आहे. वाचनालय विकास उपक्रमातून स्वतंत्र आणि सुजाण वाचक विकसित करणे हा उद्देश असून शाळा वाचनालय प्रभारी या शिक्षकांच्या प्रशिक्षणातून साध्य होणार आहेत.

रूम टू रीडबद्दल ..
साक्षरता, लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण या विषयांवर स्थानिक समुदाय, भागीदार संस्था व शासन यांच्या सहकार्याने रूम टू रीड संस्थेचे काम सुरु आहे. भारतासह बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, साऊथ आफ्रिका आदी दहा देशांमध्ये संस्था कार्यरत आहे. १६.८ दशलक्ष बालकांना संस्थेच्या उपक्रमांचा लाभ झाला आहे. २०१९ पासून नाशिकमध्ये जिल्हा परिषद आणि डायट च्या सहकार्याने स्किल अप प्रोग्राम सुरु केला आहे. याअंतर्गत २०२३ पर्यंत २४७ केंद्रांद्वारे ३२७७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांमध्ये वाचनाची सवय आणि गोडी विकसित करण्यात येणार आहे. यावर्षी सिन्नर, इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील ५९ केंद्रांद्वारे ७८४ शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १५०० पुस्तके केंद्रस्तरावर संस्थेकडून पुरवण्यात येतील. केंद्रातील सर्व शाळा फिरत्या क्रमाने (रोटेशन) महिन्यातून एकदा ही पुस्तके बदलून घेतील.

सिन्नरमधील १०१ शिक्षकांचे प्रशिक्षण
सिन्नर पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दोन दिवशीय प्रशिक्षण सत्र नुकतेच पार पडले. सिन्नर, मुसळगाव, बारागाव पिंप्री, पाथरे, शहा, वावी, ब्राम्हणवाडे, वडांगळी कीर्तनगळी, मर्हाळ केंद्रांतर्गत तालुक्यातील १०१ शाळांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. रीड टू रूमच्या मिलिंद वळवी, स्नेहल राजगुरू, विशाल कांबळे यांनी सुलभक म्हणून या प्रशिक्षण सत्रात शिक्षकांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या