Friday, May 3, 2024
Homeनगरनिवडणुकीच्या आचारसंहितेतून ‘नगर’च्या कर्जमाफीला सुट?

निवडणुकीच्या आचारसंहितेतून ‘नगर’च्या कर्जमाफीला सुट?

दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका : पोर्टलवर आज कर्जमाफीची यादी प्रसिध्द होण्याची शक्यता

मुंबई/अहमदनगर (प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे रखडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, नगर जिल्ह्यात केवळ दोनच ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणीस कोणतेही विघ्न येणार नसल्याचा सूर विविध  तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी संपर्क साधत जिल्ह्याच्या कर्जमाफीच्या यादीबाबत विचारणा केली असता, राज्यातील काही जिल्ह्यातील कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर जाहीर झाल्या असून उर्वरित जिल्ह्याच्या याद्या रात्रीतून अपलोड होणार आहेत. हे काम शुक्रवारी रात्रभर सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शुक्रवारी परिपत्रक काढून ज्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची निवडणुका आहेत, त्या ठिकाणी आचारसंहिता लागू करण्याचे आदेश काढले आहेत. नगर जिल्ह्यात अवघ्या 2 ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीला अडथळा येणार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

राज्यतील नांदेड 100, अमरावती 526, अकोला 100, अमरावती 526, यवतमाळ 461 हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात मोजक्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहेत. यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण आचारसंहिता लागू होण्याची शक्यता धूसर आहे. तसेच 100 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूक असणार्‍या जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतींच्या संख्येच्या तुलनेते हे प्रमाण 50 टक्के आहे की नाही, याची खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी हेच प्रमाण मानण्यात येणार असून तिसर्‍या पर्यायात निवडणूक आयोग विभागाने निवडणूका असणार्‍या गावांच्या सीमा लगत भागात आचारसंहिता लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत शुक्रवारी रात्री सहकारी आणि निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता मतमतांतरे समोर आली.

दरम्यान, नगर जिल्ह्यात अवघ्या दोन गावांत निवडणूक होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे असल्याने संपूर्ण कर्जमाफीची यादी शुक्रवारीतून पोर्टलवर प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली होती. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती.
………….
कर्जमाफीसाठी 25 हजार कोटींची तरतूद
विधानसभेत शुक्रवारी 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.
……………

5 जिल्ह्यांच्या याद्या प्रसिध्द
धुळे, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील कर्जमाफीची यादी प्रसिध्द झाल्या असून सहकार विभागाने त्या त्या जिल्ह्यातील उपनिबंधकांना याद्या प्रसिध्द करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या