Friday, May 3, 2024
Homeनाशिकद्राक्षाला बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत

द्राक्षाला बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत

शिरवाडे वणी। वार्ताहर

यावर्षी परतीच्या पावसाच्या संकटातून सावरलेल्या द्राक्षबागांच्या काढणीचा हंगाम ऐन बहरात आला असून यावर्षी द्राक्षमालाला कमी भाव असल्याने शेतकर्‍यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसुन येत आहे.

- Advertisement -

यावर्षी प्रारंभीची पाणीटंचाई त्यानंतरची अतिवृष्टी आणि ढगाळ हवामान यामुळे प्रारंभीच्या द्राक्षबागांना या प्रतिकूल हवामानाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी परिणामी बाजारभाव चांगला राहील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र आताचा बाजारभाव बघता द्राक्षपिकावर झालेला खर्च फिटणे अवघड झाल्याने शेतकर्‍याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यातच निर्यातक्षम द्राक्षाचे पैसे २० ते ३० दिवसानंतर द्राक्ष उत्पादकांच्या खात्यात जमा होत आहे. तर सोनाका जातीची द्राक्षमण्यांची लांबी असलेला माल बांगलादेशातील व्यापारी उचलत असून त्या द्राक्षाला ४० रुपये पासून ६० रुपये किलो पर्यंत भाव मिळत आहे.

तर मध्यम प्रतीचा द्राक्षमाल २५ ते ३५ रुपये किलो प्रमाणे बनारस, कोलकत्ता, दिल्ली, गोरखपूर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, सिलिगुडी, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आग्रा येथील परप्रांतीय व्यापार्‍यांमार्फत माल पाठविला जातो. माल पाठवल्यानंतर लोकल बाजारपेठांमध्ये जाणार्‍या मालाचे पैसे व्यापारी वर्ग दोन टक्के वापसी कापून तो शेतकर्‍यांना चेक रुपाने देतो. त्यातच दरवर्षी व्यापारी पलायनाच्या घटना या ठरलेल्याच. एकुणच द्राक्षहंगामात द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपेक्षा द्राक्षपिकावर कागदी खोके, प्लास्टिक क्रेट, रद्दी, दोरी विक्री करणार्‍या व्यावसायिकांना तसेच व्यापार्‍यांकडे पॅकिंग करणार्‍या मजुरांसह द्राक्ष निसाई करणार्‍या कामगारांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे.

सद्यस्थितीत शिरवाडे वणी, पाचोरे वणी, नांदूर, सावरगाव, रेडगाव, गोरठाण, वावी आदी गावांसह संपुर्ण तालुक्यात द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. द्राक्ष विक्रीचे व्यवहार करतांना व्यापारांबरोबर व्यवस्थित बोलणी करुन सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे. तसेच व्यापार्‍यांनी दिलेला चेक बँक खाती तपासूनच सदरच्या खात्यावर बॅलन्स आहे की नाही याची खात्री करावी. तसेच सदरच्या खात्याची उलाढाल होते की नाही हेही पाहणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत द्राक्षमालाची पॅकींग करतांना द्राक्षघडांची मोठ्या प्रमाणात मणीगळ होते व यापासून बेदाणा तयार केला जातो. साहजिकच येथे द्राक्षमणी खरेदी व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात होतात व याच मण्यांच्या भरवशावर तालुक्याच्या अनेक भागात बेदाणा निर्मिती शेड मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. द्राक्षाचे बाजारभाव स्थिर राहत नसल्याने व या हंगामाला ढगाळ हवामानाचा फटका बसत असल्याने द्राक्षपंढरीत सध्या नरम-गरम वातावरण आहे.

यावर्षी परतीचा पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे द्राक्षपिकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करुनही उत्पादन मात्र कमी निघाले. त्यातच आत्ताचा बाजारभाव बघता उत्पादन खर्च निघणे अवघड झाले असून द्राक्षशेती आता तोट्यात येत आहे. द्राक्षपिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याबरोबरच द्राक्षमालावर पूरक उद्योगधंदे उभे राहणे गरजेचे आहे. तसेच द्राक्षहंगामात द्राक्षपिकांसाठी शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे. व्यापारी पलायनावर उपाय म्हणून बाजार समित्यांनी द्राक्ष खरेदी करावे. त्यासाठी बाजार समितीच्या आवारावर द्राक्ष व्यापार्‍यांना द्राक्ष खरेदीचे परवाने द्यावे. जेणेकरुन व्यापारी पलायनाच्या घटना टळतील.
जितेंद्र निफाडे, शेतकरी, शिरवाडे वणी

- Advertisment -

ताज्या बातम्या