Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगBlog : महिला दिन; खाकीतील ‘ति’च्या कर्तृवाला सलाम

Blog : महिला दिन; खाकीतील ‘ति’च्या कर्तृवाला सलाम

अत्याचाराची घटना घडली, दिलासा देण्यासाठी ‘ती’च पुढे उभी असते, वाहतूक नियोजनासाठी भर रस्त्यावर ‘ती’ची कसरत सुरू असते, गुंड, चोर, दरोडेखोरांचा पाठलाग करायलाही ‘ती’ डगमगत नाही, घर, कुटुंब संभाळून ‘ती’ सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तयार असते. जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी अन् कर्मचार्‍यांची ही सकारात्मकता गुन्हेगारीचा कर्दनकाळच ठरते आहे. महिला दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलातील त्या 375 महिला कर्मचारी ‘दीन’ नसल्याचा धडा देत असून या स्त्री कर्तृत्वाला नेहमीच सलाम करण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा मोठा आहे, तेवढाच महिलांवर अत्याचार्‍यांच्या घटनेबाबत संवेदनशील आहे. कोपर्डी (ता. कर्जत) येथील अत्याचाराच्या घटनेने राज्यासह देश ढवळून निघाला. मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी या घटनेने पडली. अशा या संवेदनशील जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी, कर्मचारी यांची अशा गुन्ह्यांविषयी तपासाची भूमिका नेहमीच संवेदनशील राहिली आहे. गुन्हा दाखल होण्याच्या क्षणापासून, ते त्यातील पीडितेला न्याय मिळेपर्यंत त्या पीडितेबरोबर खंबीरपणे उभी राहिली, ती फक्त आणि फक्त जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी महिलाच !. पोलिसाची नोकरी 24 तास. अशा या ड्युटीला वर्दीतील महिला पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचा दिनक्रम लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

कुटुंबाची प्राथमिक सर्व जबाबदारी, स्वयंपाक, पती, मुलांची तयारी, सासू-सासरे, आईवडील, भाऊ-बहीण सर्वकाही बघून ती येत असते. त्यातच पोलीस ठाण्यात येताच कोणती ड्युटी लागेल याचा नेम नाही. कोणता प्रसंग, कधी येईल आणि त्यासाठी धावून जावे लागेल, हे सांगता येत नाही. ऊन, पाऊस, हिवाळा कोणताही ऋतू असो, बंदोबस्त चुकलेला नाही. दिवसाच्या ड्युटीबरोबरच रात्रीच्या गस्तीत देखील ती अधिकार्‍यांच्या बरोबरीने उभी असते. अशी ती वर्दीतील महिलाच असते. पण ती तिच्या कर्तृत्वातून पुरुषांची ‘सोच’ बदलत असते.

महिला अधिकारी असतानाही मी माझ्या घरातील कामे स्वतः करते व पोलीस अधिकारी म्हणून कार्यालयातील काम वेळेवर पूर्ण करते. काही वेळेस दिवसरात्र काम करण्याची वेळ येते, ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. दिलासा सेलमध्ये अधिकारी म्हणून काम करताना पतीपत्नीच्या वादावर समझोता करून त्यांना नांदायला पाठवतेय या कामाचे मानसिक समाधान खूप मोठे आहे.
– जयश्री काळे, पोलीस निरीक्षक, दिलासा सेल.

कुटुंब संभाळून पोलीस खात्यात नोकरी करताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. मी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून पोलीस खात्यात काम करते. पोलीस खात्यात नोकरी करताना महिलांचे धैर्य आणि सहनशीलतेची कसोटी असते.
– सीमा भामरे, पोलीस कर्मचारी.

आकडा छोटा अन् कर्तृत्व मोठे
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी अशा विविध पदांवर जिल्हा पोलीस दलात सुमारे 375 महिला कार्यरत आहेत. महिला पोलीस कर्मचार्‍यांचा हा आकडा छोटा दिसत असला, तरी तो त्यांच्या कर्तृत्वाने झाकून जातो, हे विशेष !

– सचिन दसपुते

9860543326

- Advertisment -

ताज्या बातम्या