Monday, May 6, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांनो धीर धरा, आगीतून फुफाट्यात पडू नका : विलास शिंदे

शेतकऱ्यांनो धीर धरा, आगीतून फुफाट्यात पडू नका : विलास शिंदे

नाशिक | प्रतिनिधी 

शेतमाल, विशेषतः द्राक्ष, भाजीपाला उप्त्पादकांच्या दृष्टीने काळ कठीण आहे. पण घाबरून जाऊ नका. कष्टाने पिकवलेले द्राक्ष मातीमोल भावाने विकून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नका. अशा संकटांचा सामना कोणीही एकटा माणूस करू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे. आपली ताकदवान यंत्रणा आपणच उभी करावी असा सल्ला सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

शोधा म्हणजे मार्ग सापडेल!

शेतमाल वाहतुकीला परवानगी असली तरी परिस्थिती अनुकूल नाही. ज्यांची जमीन दर्जेदार आहे. तग धरू शकणारी आहे अशा नाशिकमधे १५-२०% तरी बागा असतील. अशा शेतकऱ्यांनी १५ तारखेपर्यंत संयम बाळगावा. तोपर्यंत बागेची खुडणी करू नये. १५ तारखेनंतर खुडणी करावी. बंदचा कालावधी सम्पला की परिस्थिती बदलेल.

ज्यांची जमीन तशी नाही, जे खुडणी थांबवू शकत नाहीत त्यांनी उगाच घाबरून मातीमोल भावाने द्राक्ष विकू नये. उधारीवर तर बिलकुलच विकू नये. फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यांनी बेदाणे करण्याचा विचार करावा. बेदाणे करण्याचे तंत्र अनेक शेतकऱ्यांनी शिकून घेतले आहे. नाही त्यांनी माहिती करून घ्यावी. हेच संकट अन्य वेळी आले असते तर? असा सकारात्मक विचार करा.

कडक उन्हाळा सुरु आहे. दोन महिने आपल्या हातात आहेत. अशा कडक उन्हात बेदाणा करणे शक्य आहे.  याचे अनेक फायदे आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार मदत करेल अशी आशा आहे. बेदाणे तयार करायचे पुरावे ठेवले तर सरकारकडे मद्त मागता येईल. पुढचे ७-८ महिने बेदाणे विकून उत्पादन खर्च वसूल करता यईल. ज्याच्याकडे सोय आहे त्यांच्याकडे दारोदार फिरून विकण्याचा पर्याय आहे. तसे प्रयत्न काहींनी सुरु आहेत.

भाजीपाला सुकवावा !

नाशिकमध्ये भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. तोही नाशवंत आहे. बंदमुळे भाजीपाला विकणे अवघड झाले आहे. तो मिळेल त्या भावाने विकणे आणि खराब झालेला फेकून देणे हेच घडताना दिसत आहे. कडक उन्हात भाजीपाला सुकवून ठेवता यईल. कारले, दोडके यांचे काप करून ते सुकवता येतील. मे नंतर भाजीपाल्याला तेजी येईल. त्यावेळी सुकवलेल्या भाज्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता दाट आहे.

हे काम कमी खर्चात होईल आणि बरा भावही मिळेल. उत्पादन खर्च वसूल होईल. माल फेकून देण्यापेक्षा असे मार्ग शोधणे आपल्याच फायद्याचे आहे.

समूहाची ताकद ओळखा! 

संकटे सांगून येत नाहीत. हवामानही संकेतानुसार बदलत नाही. कोणत्याही संकटाला एकटा माणूस तोंड देऊ शकत नाही. समूहाने संकटाला तोंड देणे शक्य आणि थोडे सोपे होते. आमचेच उदाहरण घ्या. आमच्या कंपनीचे जे सभासद शेतकरी आहेत. त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.

यासाठी कंपनी आवश्यक ते सर्व करत आहे. समूहाची ताकद ओळखा. हे दुसरे कोणीही करणार नाही. शेतकऱ्यांनीच एकत्र यायला हवे. स्वतःची ताकदवान यंत्रणा स्वतःच उभारावी.  असे केले तर कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करणे थोडे सोपे होते हे लक्षात घ्यावे.

स्वतःवरचे नियंत्रण गमावू नका!

परिस्थिती कितीही खराब झाली तरी शेती आणि स्वतःवरचे नियंत्रण गमावू नका. असे झाले तर त्याचा फार मोठा फटका सर्वाना सहन करावा लागतो. प्रश्न आहे तेथे उत्तर आहे. फक्त ते आपण शोधले पाहिजे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी काही मार्ग सुचवले आहेत. विचार केला तर तुम्हालाही असे काही मार्ग सापडतील. ते शोधा. तसे प्रयत्न करा. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या