Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आता मास्क वापरणे अनिवार्य; नाही वापरल्यास होणार कारवाई

नाशिकमध्ये आता मास्क वापरणे अनिवार्य; नाही वापरल्यास होणार कारवाई

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात काल अचानक पाच कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शहर पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. आजपासून संपूर्ण शहरात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. जो कुणी मास्क वापरणार नाही त्याच्यावर साथरोग अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात लोकसंख्या अधिक आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरु आहेत. भाजीपाला, मेडिकल सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण याठिकाणी गर्दी करतात. यादरम्यान, अनेक ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात असले तरीदेखील अनेकजण मास्क वापरत नाहीत.

तसेच संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  कोरोना विषाणुच्या या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हॅण्डस्लोज, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

यामध्ये मास्क हे मानांकित प्रतिचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जंतुक करावे. तसेच नियमित मास्क पुन्हा वापरता येण्याजोगे असणे आवश्यक राहील असे सांगण्यात आले आहे.

जर कुणी मास्क न वापरता रस्त्यावर फिरताना आढळून आले तर त्या व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त नांगरे पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या