Tuesday, May 7, 2024
Homeनगरकोपरगावात एक कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात बाधीताचा आकडा 27 

कोपरगावात एक कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात बाधीताचा आकडा 27 

अहमदनगर/कोपरगाव (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील 60 वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे शुक्रवारी रात्री आठच्या समोर आले. कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत राहणार्‍या या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून बाधित महिला राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून शहरात हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा आता 27 वर पोहचला आहे.
दरम्यान, काल सायंकाळी जिल्ह्यातील तिसरा बाधीत व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णाला कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करत घरी सोडण्यात आले. नगर शहरातील बुथ हॉस्पिटलमधीज वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या रुग्णाला शुभेच्छा देत घरी जाण्यासाठी निरोप दिला. या तिसर्‍या बाधीत व्यक्तीला देखील घसा दुखीचा त्रास होता. त्याच्यावर नगरच्या एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर फरक पडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या घशातील स्त्रावाची चाचणी केल्यानंतर तो कोरोना बाधीत असल्याचे समोर आले होते. मात्र, या रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला घरी सोडण्यात आले
आहे.
मात्र, त्यानंतर काही तासांत कोपरगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने पुन्हा आरोग्य विभागात खळबळ माजली. कोपरगावचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे.
कोपरगाव शहरातील धामणगाव रोडवरील एका नगरमध्ये बाधित महिलेचे वास्तव्य आहे. या महिलेच्या घरात भाऊ ती असे दोघांचे वास्तव्य आहे. या महिलेला काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला आधी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखविण्यात आले. त्या ठिकाणाहून संबंधीत महिलेला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.
तिच्या घशातील स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. शुक्रवारी अहवाल प्राप्त झाला त्यात ही महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. मात्र, ही महिला अद्याप कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झालेले नाही तसेच या महिलेने, तिने कुठेही प्रवास केला नसल्याची माहिती दिली आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे.
कोपरगाव शहरात चार दिवस लॉकडाऊन
कोपरगाव शहरात एक महिला कोरोना बाधित असल्याची बातमी मिळताच तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या तातडीच्या उपाय योजना केल्या आहेत. नागरिकानी घाबरून जाऊ न जाता संयम ठेवावा.आपण आपल्या घरात सुरक्षित आहात. घरात राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असून उद्यापासून कोपरागव शहरात चार दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. नागरिकांचे चुकीचे पाऊल प्रशासनावरचा कामाचा ताण वाढवू शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे.
– आ.आशुतोष काळे
आणखी 16 नमुने तपासणीला
शुक्रवारी रात्री नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील आणखी 16 नमुने पुण्याच्या लष्काराच्या शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासह कोपरगाव येथील बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
असा आहे सारांश
दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने 1014 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. या 25 बाधिताशिवाय एक जण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील आहे. दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. 920 जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप 62 स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. 7 स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात 159 जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 593 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
- Advertisment -

ताज्या बातम्या