Monday, May 6, 2024
Homeनाशिकमालेगाव शहर आजपासून चार दिवस संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’

मालेगाव शहर आजपासून चार दिवस संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’

मालेगाव : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात शनिवार 11 एप्रिल 2020 रोजीच्या सकाळी 07:00 वाजेपासून ते मंगळवार 14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12:00 वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) करण्यात येणार आहे. दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत आदेश काढला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे.

- Advertisement -

परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते. मालेगाव शहरात 8 व 9 एप्रिल 2020 रोजी कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे या रुग्णांपासून मालेगाव शहरातील इतर नागरिकांच्या जिवितास कोरोना (कोविड-19) या आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव शहरात पुर्णत: संचारबंदी करणे अनिवार्य आहे. तसेच अपर पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे.

या पार्श्वभूमीवर दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. शर्मा यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार संपूर्ण मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1)(3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. यात अत्यावश्यक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही दंडाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

आयुक्त महानगरपालिका, मालेगाव यांनी कन्टेन्टमेंट क्षेत्र म्हणुन प्रतिबंधीत केलेले भाग वगळता उर्वरित भागाकरिता या आदेशातून खालील आस्थापना, दुकाने यांना वगळणेत येत असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

यात प्रामुख्याने मेडीकल्स, रुग्णालये, दुध व चारा पुरविणारे विक्रेते, गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीज्, शासकीय धान्य गोदामापासून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत वाहतुक करणारी वाहने व त्यासाठीचे मनुष्यबळ, उपविभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीने अन्नदान करणाऱ्या व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था, केवळ हातगाडीवरून भाजीपाला विक्री करणारे विक्रेते व किराणा दुकाने यांना सकाळी 07:00 ते दुपारी 12:00 वाजेपावेतो सुट राहील.

तसेच केवळ पोलिस विभाग, महसुल विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर व त्यांच्या आस्थापनेवरील स्टाफ यांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यात येणार असून शहरी हद्दीपासून 2 किलोमीटर परिघातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद राहतील. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधीत आपत्ती निवारण व्यवस्थापन (महसूल विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी) यांना यातून वगळण्यात आले आहे, मात्र त्यांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या