Friday, May 3, 2024
Homeनगरघातक रसायनपासून तयार होतेय दारू

घातक रसायनपासून तयार होतेय दारू

माळी बाभुळगावच्या छाप्यामुळे पोलिसांच्या संशयाला पुष्टी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्गचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश आणि लॉकडॉऊन आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद आहेत. दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी व्यसनाच्या आहारी गेलेल्यांकडून जास्त किंमत मोजून दारू मिळवायचा प्रयत्न आहे. याचाच गैरफायदा घेत काहींनी घातक केमिकलपासून दारू निर्मिती करून ती चढ्या भावाने विकण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अलिकडच्या काळात पोलिसांनी जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.

- Advertisement -

मागील आठ दिवसांमध्ये पोलिसांनी जिल्ह्यातील विविध भागात टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांची दारू, घातक रसायन, इतर साहित्य जप्त केले आहे. सुमारे 20 ते 25 व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम 328 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने लॉकडॉऊन काळात सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यात दारू विक्रीचाही समावेश आहे. दारू मिळत नसल्याने व्यसनाधीन तरुण बेचैन झाले आहेत. काळ्या बाजारातून मिळणार्‍या दारूकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यावरच ते आपले व्यसन शमवित आहेत.

नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये हातभट्टी दारुची निर्मिती केली जाते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ते उघडही झाले आहे. घराच्या मागे, घराच्या छतावर, शेतात असे विविध ठिकाणी हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यातील अनेक धंदे उध्वस्त करून त्यासाठी वापरण्यात येणारे रसायन पोलिसांनी नष्ट केले. शरीरासाठी अंत्यत घातक असे हे रसायन होते. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथे माजी सरपंचच्या घरी छापा टाकला. या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. माजी सरपंच व सराईत गुन्हेगार असलेला विजय आव्हाड याने स्वतःच्या घरातच दारूचा कारखाना थाटला होता.

विविध ब्रँडेड मद्य कंपनीच्या बाटल्यामध्ये केमिकलपासून तयार केलेली दारू भरून तो विकत होता. जिल्ह्यात असे अनेक बनावट कारखाने असण्याचीही शक्यताही यामुळे व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी घातक केमिकलपासून तयार केलेल्या दारूचे सेवन केल्यामुळे नगर तालुक्यातील पांगरमल येथील दहा जणांना जीव गमवावा लागला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी दारू अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या केमिकलपासून दारू निर्मिती केली जात असल्याचे समोर आले आहे.

लॉकडॉऊनमुळे परमीट बार, सरकारमान्य दारू दुकाने बंद असल्याने व दारूची वाढती मागणी लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घातक दारुची निर्मिती केली जात असल्याचा संशय यामुळे बळावला आहे. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेऊन असे बनावट दारु कारखाने उध्वस्त करण्याची मागणीही माळी बाभुळगाव येथील प्रकारानंतर पुन्हा एकदा होऊ लागली आहे.

तर दहा वर्ष सक्तमजुरी…
हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार्‍या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी कडक पावले उचलले आहेत. हातभट्टी निर्मिती व विक्री करत मानवी जीवितास धोका निर्माण करणार्‍यांवर पोलिसांकडून भादंवि कलम 328 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालतो. आरोपींना अटक झाल्यानंतर लगेच जामीन मिळत नाही. तसेच, गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची तरतूद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या