Friday, May 3, 2024
Homeनगरमुहूर्तावरील खरेदी सोडा, सुवर्ण, दुचाकी, चारचाकी व्यवसायच ठप्प!

मुहूर्तावरील खरेदी सोडा, सुवर्ण, दुचाकी, चारचाकी व्यवसायच ठप्प!

एकट्या नगर जिल्ह्यात 100 कोटींहून अधिकची उलाढालच थंडावली

अहमदनगर (प्रतिनिधी)- साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे दोन महत्त्वाचे असणारे मुहूर्त करोना संसर्गामुळे वाया गेले आहेत. पाडव्याच्या आधीपासून सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा व्यवसाय सुवर्ण व्यवसाय, दुचाकी आणि चारचाकी व्यवसाय पूर्णपणे ठप्पच झाला आहे. यामुळे या व्यवसायात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर एकट्या नगर जिल्ह्यात 100 कोटींहून अधिकची उलाढाल थांबली असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला असून याचा जिल्ह्याच्या अर्थकारणावर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नगर जिल्हा साखर कारखानदारीचा आणि दूध व्यवसायचा जिल्हा आहे. या दोन्ही व्यवसायांवर जिल्ह्याचे अर्थकारण आणि समाजकारण सुरू आहे. आधीच लहरी हवामानामुळे आर्थिक संकटात असणार्‍या साखर कारखानदारीसोबत जिल्ह्यात करोना संसर्गामुळे दूध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य शेतकर्‍यांपासून अन्य घटकांवर

झाला आहे. त्यात साधारण महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने नगरच्या बाजारपेठेसह सुवर्णकार व्यवसायिक ठप्प आहे. आधी गुढीपावडा कोरडा गेला. यामुळे काही प्रमाणात अक्षय्य तृतीयाला दिलासा मिळेल, या भ्रमांत सुवर्ण व्यावसायिक होते. मात्र, करोना संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन वाढल्याने हे व्यवसाय देखील लॉकडाऊन झाले आहेत.

गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयाला नगर जिल्ह्यात एकाच दिवशी 50 कोटी रुपयांची सुवर्ण व्यवसायिकांची उलाढाल झाली होती, अशी माहिती सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संतोष वर्मा यांनी दिली. जिल्ह्यात शहर आणि जिल्हा मिळून साधारण 2 हजार 500 सुवर्णकार व्यवसायिक आहेत. हे सर्वजण महिनाभरापासून कामकाज गुंडाळून गप्प आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास छोटे सुवर्ण व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. ग्रामीण भागात याचा फटका अधिक असणार असल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशीच अवस्था नगर शहर आणि जिल्ह्यातील दुचाकी आणि चार चाकी विक्रेत्यांची झाली आहे. दरवर्षी गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया वाहन खरेदीचे प्रमाण अधिक असते. एरवीच्या तुलनेत या दोन मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात वाहनाची विक्री होते. मात्र, करोना लॉकडाऊनचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील दुचाकी, चार चाकी विक्री ठप्प आहे. त्यानंतर आता एप्रिल महिना लॉकडाऊनमध्ये संपणार आहे.

एकट्या दुचाकाची विक्री आणि सेवा या व्यवसायावर 2 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांचे कुटुंब अवलंबून असून या कर्मचार्‍यांना किती दिवस विनाकाम सांभाळायचे असा प्रश्न दुचाकी डिलरसमोर राहणार आहे. जिल्ह्यात साधारण 170 च्या जवळपासून अधिक दुचाकी डिलर असल्याचे व्यावसायिक संदेश वखारिया यांनी सांगितले. साधारणपणे जिल्ह्यात अक्षय तृतीया दिवशी 5 कोटीहून अधिकचा विक्रीचा व्यवसायाला फटका बसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

याहून अधिक वाईट अवस्था तर चारचाकी विक्री व्यवसायाची झालेली आहे. मुहूर्तावर जिल्ह्यात साधारणपणे 400 ते 450 वाहनांची विक्री होते. मात्र, यंदा सर्व काही ठप्प आहे. यासह शोरूम, कर्मचार्‍यांचा पगार, अन्य बाबींवरील खर्च डिलर्स किती दिवस सोसणार असा प्रश्न आहे. सरकारने यातून मार्ग काढण्याची मागणी होती आहे. एकूणच करोनामुळे नगर जिल्ह्यात अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 100 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अत्यावश्यक सेवेत सुवर्णकारांचा समावेश करा : वर्मा
गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांजवळील पुंजी संपत आली आहे. यामुळे आता त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी स्वत: जवळ असणारे ग्रॅम, दोन ग्रॅम मोडणे अथवा तारण ठेवण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे प्रशासनाने दररोज किमान दोन ते तीन तास सुवर्णकारांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, यातून गरजवंतांची सोय होणार आहे. कोणतीच बँक सध्या सोने तारण कर्ज देत नसल्याने सुवर्णकारांच्या माध्यमातून सामान्यांची सोय होणार असल्याची मागणी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संतोष वर्मा यांनी केली आहे.

करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या चारचाकी व्यवसाय करणार्‍या शोरूम आणि डिलर्ससाठी वाहन कंपन्यांनी पुढाकार घेऊन काही प्रमाणात मदत करण्यासोबत, जुनी काही देणी देण्याच्या विचारात आहेत. मात्र, लॉकडाऊन किती दिवस सुरू राहील, किती दिवस कर्मचार्‍यांना घरून पगार द्यावयाचा, सरकारचे धोरण यासर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे. करोना संसर्गाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसणार असल्याने आताच काही सांगता येणे कठीण आहे.
– विजयभाऊ गडाख, संचालक, इलाक्षी मोटर्स.

- Advertisment -

ताज्या बातम्या