Friday, May 3, 2024
Homeनाशिकथेट करोनाशी भिडणाऱ्यांनाच मिळेनात सुविधा; मालेगावी आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे हाल

थेट करोनाशी भिडणाऱ्यांनाच मिळेनात सुविधा; मालेगावी आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे हाल

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्ह्यातील अर्धी पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा मालेगावी कार्यरत आहे. परिणामी त्यांनाही करोनाची लागण होण्यास सुरूवात झाली आहे. अशा प्रकारे करोनाशी थेट लढणारे पोलीस व आरोग्य कर्मचार्‍यांनाच त्या ठिकाणी सुविधा मिळत नसल्याने मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा अरोग्य कर्मचारी तसेच पोलीसांनी मांडल्या.

- Advertisement -

मालेगावी करोना बाधीतांचा आकडा तीनशे जवळ पोहचला आहे. जिल्हा प्रशासनाने मालेगाव येथे नागरीकांना लॉकडाऊनचे पालन व्यवस्थीत करावे यासाठी जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 800 पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांनी मालेगावी नियुक्ती केली आहे. तर आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील शासकीय डॉक्टर, वैद्यकिय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर नर्सिंग स्टाप, आरोग्य परिचर, आरोग्य सामाजिक कार्यकर्ते अशी मोठी पथके मालेगावमध्ये पाठवण्यात आली आहेत.

जिल्हा रूग्णालय, संदर्भसेवा रूग्णालय, जिल्हा परिषद येथील डॉक्टर, परिचारीकांना मालेगाव येथे सेवा देण्याची सक्ती करण्यात आली आहे. हे आपले कर्तव्य तसेच आपली जबाबदारी असल्याच्या भावनेतून चांगली सेवा देण्यासाठी सर्वजण मालेगाव येथे कार्यरत आहेत. परंतु प्रत्यक्ष करोना रूग्णांशी दररोज सबंध येणार्‍या आरोग्य कर्मचारी व पोलीसांना सुविधांची मात्र वानवाच आहे.

शासकीय परिचारीका व डॉक्टरांची बसस्थानकांजवळील हॉटेल तसेच होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे हॉटेल प्रत्यक्ष तेथील 3 शासकीय रूग्णालयांपासून 3 ते 6 किलोमीटर अंतरावर आहेत. परंतु त्यांना ये जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वाहनाची व्यवस्था नाही. यामुळे त्यांना तेथून चालतच जावे लागते. प्रामुख्याने रात्री 8 च्या पाळीला सेवा देण्यासाठी जाणार्‍या महिला डॉक्टर तसेच परिचारीकांना जीव मुठीत घेऊनच चालत जावे लागते. जेवणासाठी नास्ता एका ठिकाणी, जेवण दुसर्‍या ठिकाणी तेही वेळेवर मिळेल याची शाश्वती नाही. तसेच कामाचे तास निश्चित नसून 15 दिवसांची करोना कक्षात सलग सेवा देण्यात आली आहे. जी इतर ठिकाणी 8 दिवस आहे.

मालेगाव येथे सर्वाधिक हाल पोलीसांचे आहेत. त्यांच्यासाठी मालेगाव मधील विविध ठिकाणची दहा ते बारा मंगलकार्यालये ताब्यात घेतली आहेत. त्या ठिकाणी एकत्रच दाटीवाटी गाद्या जमीनीवर अंथरून त्यांची झोपण्याची व्यवस्था केली आहे. सर्वात मिळून 3 ते 4 शौचालये, नास्ता, जेवणाचे हाल, अनेकांचे वय 50 पेक्षा अधीक प्रत्यक्ष नागरीकांशी सातत्याने सबंध यामुळे मालेगावत करोनाची बाधा झालेल्या पोलीसांची संख्या 50 च्या घरात गेली आहे.

प्रत्यक्ष करोनाशी लढा करणार्‍या व्यवस्थेलाच पुरेशी साधने तसेच सुरक्षा मिळत नसल्याने करोनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने मदत म्हणुन दिलेले कोट्यवधी रूपये कोठे गेले असा प्रश्न हालअपेष्टा सहन करणारे शासकीय कर्मचारीच करत आहेत.

पोलीसांना केले जाईना क्वारंटाईन

मालेगावात अनेक ठिकाणी पोलीसांची राहण्याची व्यवस्था एकत्र आहे. यामधील काही पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे त्यांच्या समवेत राहणर्‍या पोलीस कर्मचार्‍यांची तातडीने तपासणी होऊन त्यांना कोरोंटाईन करण्याची आवश्यकता आहे. मात्र अनेक दिवस होऊनही अशा अनेक पोलीसांना कोरोंटाईन न केल्याने पोलीसांमधील धोका वाढत चालला असल्याने अनेक पोलीस मानसिक दबाखाली गेले आहेत. शासकीय यंत्रणेने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे काही पोलीस कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

किमान सुविधा मिळाव्यात

सर्वत्र जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचारी करोनाग्रस्त भागात सेवा देत आहेत. इतरत्र आरोग्य सेवकांना चांगल्या सुविधा आहेत मात्र मालेगाव येथे त्यांचे हाल होत असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे येत आहेत. सर्वच आरोग्य कर्मचार्‍यांना किमान सुविधा तरी मिळाव्यात तसेच तातडीने सर्व रिक्त जाग्या भरण्यात याव्यात अशी मागणी आम्ही आरोग्य उपसंचालकांना केली आहे.

– पुजा पवार, अध्यक्ष जिल्हा नर्सेस असोसिएशन

- Advertisment -

ताज्या बातम्या