Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात दोन दिवसात आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात दोन दिवसात आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण

आतापर्यंत पॉझिटिव्ह ४५, एकूण १२ रुग्णांचा मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात आतापर्यंत ४३ आणि अमळनेर येथील रुग्णालयामधील आतापर्यंतचे दोन असे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४५ झाली. तर जिल्ह्यात आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या १२ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७ जणांना संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील ओपीडीत आतापर्यंत एकूण ६२२१ जणांचे स्क्रिनिंग झाले.

जळगाव, भुसावळ, पाचोर्‍यातील रुग्णांचा समावेश
शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये ७७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात पॉझिटिव्ह, तर ७० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष आहेत. यात जळगावातील जोशीपेठ, मारुतीपेठमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील त्याच भागामधील ३३ आणि २६ वर्षीय पॉझिटिव्ह तरुण कारागिरांचा समावेश आहे.

तसेच पाचोर्‍यातील २७ आणि भुसावळमधील ४२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचाही समावेश आहे. तीन महिलांमध्ये पाचोर्‍यातील ६५ वर्षीय, भुसावळातील ५५ वर्षीय व २१ वर्षीय चिचोंल (ता. बाळापूर, जि.अकोला) येथील तरुणी असून ती रुग्ण जळगावातील समतानगरात राहते, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

संशयित ३७ रुग्ण दाखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात संशयित ३७ रुग्णांना दाखल करण्यात आले. तर संशयित ३६ रुग्णांचे स्वॅब घेतले आहे.

आतापर्यंत एकूण ७२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील ६२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर ५८ अहवाल प्रलंबित आहेत. या रुग्णालयात पॉझिटिव्ह चार गंभीर, तर मध्यम स्वरुपातील २६ रुग्ण उपचार घेत आहेत.

जळगावातील मेहरुणमधील एक रुग्ण बरा झाल्याने त्यास या अगोदरच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी आतापर्यंंत एकूण ५४६ जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या