Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षक संच मान्यतेसाठी विद्यार्थी आधारकार्ड सक्तीचे

शिक्षक संच मान्यतेसाठी विद्यार्थी आधारकार्ड सक्तीचे

संगमनेर (वार्ताहर) – राज्यात पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक संच मान्यता देताना केवळ आधार कार्ड नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या धरली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्यास विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी धरली जाणार नसल्याने शिक्षक पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे. यासंदर्भात शाळांनी सध्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड विद्यार्थी पोर्टलवरती तात्काळ अपडेट करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या काही वर्षापासून शाळेची शिक्षक संचमान्यता ही ऑनलाइन स्वरूपात करण्यात येत आहे. त्यामुळे शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ही नोंदणी करताना यापूर्वी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नव्हते. त्यामुळे केवळ त्या विद्यार्थ्यांचा इतर तपशील नोंदविण्यात आला होता. या विद्यार्थ्यांसह शाळांच्या शिक्षक मान्यतेसाठी संख्या धरली जात होती.

- Advertisement -

मात्र या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची आधार कार्ड संदर्भातील माहिती संकेतस्थळावर पुरेशा प्रमाणात नोंदवली गेली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांशिवाय उर्वरित विद्यार्थ्यांच्या संख्येवरती शिक्षक पदाची मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळांना शासनाच्या संकेतस्थळावरती शाळेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळांकडे उपलब्ध नसेल आणि विद्यार्थी शिकत असेल तर त्याचा शिक्षणाचा हक्क काढून घेतला जाणार नसला तरी त्याचा फायदा शाळांना शिक्षक पदे मंजूर करताना होणार नाहीत. ही बाब लक्षात घेता सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अपडेट करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या वर्षीची संच मान्यता 31 जानेवारीच्या पटावर
राज्यात गेल्या काही वर्षापासून शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे त्या शिक्षकांची समायोजन करणे कठीण होत आहेत. ही बाब लक्षात घेता संस्थाचालकांना विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी संधी देण्याच्या दृष्टीने सन 2019/20 या वर्षातील संच मान्यता रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरवर्षीची संचमान्यता 30 सप्टेंबरच्या पटावर करण्यात येत होती. मात्र सप्टेंबर महिन्यात घेतलेला स्थगितीचा निर्णय जानेवारीमध्ये सरकार बदलताच उठविण्यात आला. त्यामुळे संच मान्यता होणार नसल्यामुळे अनेक शाळांनी सदरची माहिती सप्टेंबरमध्ये संकेतस्थळावर अपडेट केली नव्हती. अखेर शासनाने आवाहन करून 31 जानेवारीपर्यंत विद्यार्थी पटसंख्या नोंदविण्यास सांगितले होते. त्यामुळे 31 जानेवारीअखेर असलेल्या विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची पदे या वर्षी मंजूर करण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत नोंदवा आधारकार्ड
शाळेत सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, तपशिलवार माहिती संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संकेतस्थळावरती नोंदविण्यात आलेले नाहीत. अशी संख्या व विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या लॉगीन वरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची यादी लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर संकलित करून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती संकेतस्थळावर नोंदवायची आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढण्यात आलेली नाहीत त्यांची आधार कार्ड लॉकडाऊन उठल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आधार केंद्रावरून काढून घेण्यात यावी असेही संचालनालयाने कळविले आहे.

आधार कार्ड किती महत्वाचे
प्राथमिक, माध्यमिक स्तरावर शाळांना शिक्षक देताना विद्यार्थ्यांची संख्या महत्त्वाची भूमिका बजावत असते. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची पदे अवलंबून असणार आहेत. 60 पर्यंतचे विद्यार्थी असल्यास 2 शिक्षक, 90 पर्यंत विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक, 120 पर्यंत विद्यार्थी असल्यास चार शिक्षक व 150 पर्यंत शिक्षण असल्यास 5 शिक्षक व मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात येत आहेत. यात 60 पेक्षा एक विद्यार्थी अधिक असला तरी तिसरा शिक्षक मंजूर करण्यात येतो. मात्र शाळेत विद्यार्थी अधिक असूनही आधार कार्ड असलेले विद्यार्थी नसल्यास शिक्षकांची संख्या घटणार आहे. त्यामुळे यापुढे शाळा आणि मुख्याध्यापकांना अधिक जागृत व्हावे लागणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या