Wednesday, May 8, 2024
Homeनगरजामखेड : राजुरच्या रेशन दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा

जामखेड : राजुरच्या रेशन दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा

प्रांताधिकारी अर्चना नष्टे, आ. रोहित पवार, तहसीलदार नाईकवाड यांनी दिली अचानक भेट
जामखेड (तालुका प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार विशाल नाईकवाडे, पुरवठा अधिकारी नितीन बोरकर, आमदार रोहित पवार तालुक्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याच दरम्यान आ. रोहित पवार प्रशासकीय अधिकारी समवेत खर्डा येथील टंचाईचा दौर्‍यावरून परतत असताना राजुरी गावातील स्वस्त धान्य दुकानास भेट दिली. स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी राळेभात यांना दुकान का बंद आहे. याची विचारणा केली असता चावी नसल्याचे सबब सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावेळी कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला.
दुकानातील शिल्लक मालाचा तपशील व परिस्थिती पाहता त्यांनी दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी केली व प्रशासनाला तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. आ. रोहीत पवार यांना राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. याबाबत टंचाई दौर्‍यानिमित्ताने खर्डा येथील मोहरी तलावातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलीत स्वस्त धान्य दुकान गाठले. आ. रोहीत पवार यांनी धान्य दुकानाचे कुलूप तोडण्यास सांगितले व दुकानची पाहणी केली असता दुकानात धान्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.
मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. यावेळी संबंधित दुकानदाराने आमदार रोहित पवार, प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. आ. रोहीत पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना धान्य मिळणे आवश्यक असताना तालुक्यातील दुकानदार अशा पध्दतीने वागत असतील तर सर्वच दुकानांची तपासणी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
महसुलच्या पथकाने आमदारांचा ताफा गेल्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका पुरवठा अधिकारी नितीन बोरकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील लटके व कर्मचारी यांनी हाती घेतली. या तपासणीचा अहवालात एप्रिल व मे महिन्याचा धान्य दुकानदार शासनाकडून गहू 106.50 क्विंटल, तांदूळ 151.50 क्विंटल, साखर 1.90 क्विंटल अंत्योदय लाभार्थीसाठी देण्यात आली होती. त्यापैकी धान्य वाटप केल्यानंतर दुकानात सहा क्विंटल गहू, तांदूळ 15.79 क्विंटल, व अंत्योदय साखर 75 किलो साठा जास्त आढळून आला त्यानुसार धान्य दूकानदाराने पॉस मशीनवर स्वतःच्या अंगठ्याने पावत्या काढून लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले असून लाभार्थ्यांना वंचीत ठेवले असल्याचा अहवाल दिला आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी धान्य दुकानदार यास तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटीचा खुलासा 48 तासात न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे असे पत्र दिले आहे. आ. रोहीत पवार यांनी स्वस्त धान्य दुकानदाराबाबत कडक धोरण घेतले असल्याने तालुक्यातील दुकानदाराची पाचावर धारण बसली.
- Advertisment -

ताज्या बातम्या