Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशपरदेशात अडकलेल्या 15 हजार भारतीयांच्या परतीचा मार्ग मोकळा

परदेशात अडकलेल्या 15 हजार भारतीयांच्या परतीचा मार्ग मोकळा

सार्वमत

नवी दिल्ली – करोना संकटामुळे जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून आठवडाभराचे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह 14 हजार 800 नागरिकांना परत भारतात आणण्यात येणार आहे. 7 मे पर्यंत जवळपास 64 विमान उड्डाणांनी या नागरिकांना परत आणले जाईल, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

दररोज जवळपास दोन हजार नागरिकांना घेवून येण्याची केंद्राची योजना आहे. विमानात बसण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय पडताळणी केली जाईल. ज्या नागरिकांमध्ये ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येतील त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार नाही. आरोग्य तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रवाशांना पालन करावे लागेल, असेही पूरी यांनी स्पष्ट केले. 64 उड्डाणांपैकी संयुक्त अरब अमिरात वरून 10, कतार-2, सौदी अरब-5, युके-7, सिंगापूर-5, यूएस-7, फिलिपिन्स-5, बांगलादेश-7, बहरेन-2, मलेशिया-7, कुवैत-5 तसेच ओमान वरून 2 उड्डाणे संचालित केल्या जातील. प्रवासाची व्यवस्था सशुल्क राहील. लंडन ते मुंबई साठी 50 हजार रूपये आकारले जातील. याचप्रमाणे लंडन ते अहमदाबाद, लंडन ते बंगळूर तसेच लंडन ते दिल्ली दरम्यानही 50 हजारांचे भाडे प्रवाशांना द्यावे लागेल. शिकागो-दिल्ली-हैद्राबाद प्रवासासाठी जवळपास 1 लाख रूपये प्रवाशांना द्यावे लागतील.

कोणत्या दिवशी किती भारतीय येणार मायदेशी?

1) 7 मे – 9 देशांतून 2,300 नागरिक कोच्ची, कोझिकोड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद तसेच श्रीनगर येथे पोहोचतील

2) 8 मे – 8 देशांतून जवळपास 2,050 भारतीय चेन्नई, कोच्ची, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर तसेच दिल्ली येथे उतरतील

3) 9 मे -9 देशांतून 2,020 भारतीय मुंबई, कोच्ची, त्रिची, हैदराबाद, लखनौ तसेच दिल्ली येथे पोहोचतील

4) 10 मे – 8 देशांतून 1 हजार 850 नागरिक त्रिवेंद्रम, कोच्ची, चेन्नई, त्रिची, मुंबई, दिल्ली तसेच हैदराबाद येथे पोहोचतील

5) 11 मे -9 देशांतील 2 हजार 200 नागरिक कोच्ची, कोझिकोड, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, श्रीनगर तसेच बंगळूर येथे येतील

6) 12 मे – 10 देशांतून 2 हजार 500 प्रवासी हैदराबाद, दिल्ली, बंगळूर, श्रीनगर, अहमदाबाद तसेच कोच्ची येथील विमानतळावर उतरतील

7) 13  मे – 8 देशांतून 1 हजार 850 प्रवासी कोझिकोड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद तसेच अमृतसर येथे पोहोचतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या