Friday, May 3, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पगारातून 40 टक्के कपात

साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पगारातून 40 टक्के कपात

शासनाचे आदेश डावलून ठेकेदारांची मनमानी; कर्मचार्‍यांची संस्थान प्रशासनावर नाराजी

शिर्डी शहर – शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडे कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये काहींना मालामाल तर काहींची हाल अशीच परिस्थिती लॉकडाऊन कालावधीत अनुभवायला मिळत आहे. साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करत असलेल्या कामगारांच्या पगारातून 40 टक्के वेतनवाढ केलेली रक्कम कपात करण्यात आली आहे. त्यांच्या तुटपुंज्या पगारात कुटुंब कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्यापुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन घोषित करून तब्बल चाळीस ते पंचेचाळीस दिवस उलटले आहेत. त्यामुळे 17 मार्चपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार कमीतकमी कामगारांना कामावर बोलावून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी रोजंदारी अथवा कंत्राटी कुठलाही कामगार असला तरी त्यांच्या वेतनात कपात करू नये अथवा त्याला महिन्याचे पूर्ण पेमेंट करावे, असे आदेश दिलेले असतानाही शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडे कार्यरत असणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार कपात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकप्रकारे साईबाबा संस्थानकडे कार्यरत असणार्‍या कुशल अकुशल व कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार कपात करून संबंधितांनी मुख्यमंत्री व शासनाचे आदेश धाब्यावर बसवले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात या कर्मचार्‍यांना वेळेवर पगार झाले नाहीत, साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन मंडळाने दोन वर्षांपूर्वी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पगारात 40 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. तो दिलाही, पण त्यांच्या पगारातून जर ती वेतनवाढीची रक्कम कपात करून त्यांना दिली जात असेल तर ही मोठी दुर्दैवाची बाब आहे.

याबाबत संस्थानला शासनाचे आदेश लागू होतात की नाही अथवा संबंधित ठेकेदारावर कुणाचा वरदहस्त असल्यामुळे तो अशा प्रकारचे कृत्य करतो की काय अशी चर्चा कंत्राटी कामगारांमध्ये आहे. नेमकं या प्रश्नाला वाचा कोणी फोडायची हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. संस्थानकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून असलेल्या कर्मचार्‍यांना सर्वाधिक काम असते या कामाचा मनाप्रमाणे मेहनताना त्यांना मिळत नाही संस्थानच्या सेवेत कायम राहो, बाबाच्या दरबारात आपल्याला नोकरीची संधी मिळाली यातच समाधान मानणार्‍या कर्मचार्‍यांसमोर मात्र दरवर्षी आणि दर पगाराला नवे एक संकट उभे ठाकलेले असते.

आता शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कर्मचार्‍याला मदतीचा हातभार देण्याचे जाहीर केले असतानाही संबंधित कर्मचार्‍यांना मदत तर सोडाच, आहे त्या पगारात कपात करून प्रशासनाने अथवा संबंधित ठेकेदाराने एक मोठा आर्थिक धक्काच दिला आहे.

संस्थान प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून कोणाच्या आदेशाने कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार कपात केले असेल त्यांना पुन्हा या कर्मचार्‍यांना कपात केलेले वेतन देण्यास भाग पाडावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचारी करत आहेत.

साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांबाबत 40 टक्के वेतनवाढीचा सकारात्मक निर्णय घेऊन अनेक वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करत असणार्‍या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देत या कर्मचार्‍यांना 40 टक्के पगार वाढ देण्यात आली होती, मात्र लॉकडाऊन काळात वेतनवाढीची रक्कम कपात केली असून कुशल कामगारांना 13 हजार 420 तर अकुशलचा कामगारांचा पगार 12 हजार 151 रुपये देण्यात आला आहे.त्यामुळे या पगारात महिनाभर कुटुंबाची उपजिविका कशी भागवायची याची चिंता या कामगारांना भेडसावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या