Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे नाराज

विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे नाराज

सार्वमत

जळगाव – विधानसभेनंतर आता विधान परिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणार्‍यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणार्‍यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेनं चाललाय, असा त्रागा खडसे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

- Advertisement -

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. चारही जागांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षानं नव्या चेहर्‍यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचं नाव दिल्लीला पाठवण्यात आलंय असं मला सांगण्यात आलं होतं. पण आता वेगळीच नावं समोर आली आहेत. त्यात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत. याच पडळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. जवळपास पक्षाला शिव्याच घातल्या होत्या. मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत अनेक वर्षे असलेल्या मोहिते-पाटलांना संधी मिळाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मी 40 ते 42 वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. आतातरी मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाला शिव्या घालणार्‍यांना मान दिला गेला. भाजप कोणत्या दिशेनं चाललाय, यावर आता चिंतन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या